व्यावसायिकांकडून सामान हटविण्यास सुरुवात

By Admin | Updated: January 5, 2017 02:11 IST2017-01-05T02:11:28+5:302017-01-05T02:11:45+5:30

मनपा, पोलीस सज्ज : भंगार बाजारावर हातोडा पडणार

Beginning to remove goods from professionals | व्यावसायिकांकडून सामान हटविण्यास सुरुवात

व्यावसायिकांकडून सामान हटविण्यास सुरुवात

सिडको : सातपूर-अंबड लिंकरोड येथील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजारावर येत्या काही दिवसांत हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे बहुतांशी व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील साहित्य स्वत:हून हटविण्यास सुरुवात केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
भंगार बाजार हटविण्याची कारवाई सुरू असल्याने याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील व्यावसायिकांच्या बैठका घेऊन स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले.
गेल्या दोन जानेवारी रोजीच भंगार बाजारावर हातोडा पडणार होता, परंतु त्यादिवशी नाशकात मुख्यमंत्री येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले
होते. त्यामुळे त्यादिवसाची
कारवाई टळली असली तरी येत्या दोन ते तीन दिवसांत (दि. ७) यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता असल्याने भंगार व्यवसायिकांनीदेखील त्यांची मानसिक तयारी केल्याचे दिसत आहे. यामुळे येथील काही व्यावसायिकांनी आता स्वत:हूनच अतिक्रमण काढण्यात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
मनपाचे माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच यासाठी शिवसेनेनेदेखील आयुक्तांना निवेदन देत भंगार बाजार हटविण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Beginning to remove goods from professionals