१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:36 IST2025-10-17T18:35:15+5:302025-10-17T18:36:05+5:30
Prashant Hiray News: माजी मंत्री प्रशांत हिरे आणि त्यांच्या कुटुंबीय अडचणीत आळे आहे. नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या कोट्यावधींच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
Nashik Crime News Latest: बनावट कर्जप्रकरणे करत मंजूर कर्जाची रक्कम कुटुंबीयांच्या खात्यावर वर्ग करत कर्जाची परतफेड न करता १७ कोटी ७४ लाख ७५ हजार १५७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, योगिता अपूर्व हिरे, स्मिता हिरे, राजेश शिंदे, संतोष घुले यांच्यासह जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा महिला विकास सहकारी बँकेत वर्ष २०२१ मध्ये योगिता हिरे या अध्यक्ष होत्या. महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समितीमध्ये पदाधिकारी असलेले अपूर्व हिरे, प्रशांत हिरे यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्या नावे बनावट कर्जप्रकरणे तयार करत मंजूर कर्जाची रक्कम कुटुंबीयांच्या खात्यांवर वर्ग केली.
संस्थांमधील कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेच्या माजी कर्मचारी रिना गोसावी (रा. पाथर्डी फाटा) यांनी दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप
फिर्यादीसह संस्थेच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नावे अशाप्रकारे कोणतेही अतिरिक्त तारण न घेता विनातारण, विनियोग दाखले न मागता मर्यादाबाह्य महिला सभासद असताना पुरुष सभासदांना कर्ज वितरण गैरमार्गाचा अवलंब केले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांना धमकावून कर्जप्रकरणासाठी बनावट स्वाक्षऱ्याही संबंधितांनी संगनमताने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हे खोटे, राजकीय द्वेषातून दाखल केले
"संबंधित गुन्हे हे खोटे व राजकीय द्वेषातून नोंदविले गेले आहे. संबंधितांचे वैयक्तिक कर्ज असून, गुन्ह्यांमधील आर्थिक गैरव्यवहारात आमचा किंवा संस्थांचा संबंध नाही. पोलिसांनी सर्व बँक खाती तपासावे. संबंधित व्यक्ती संस्थेमध्ये व्यवस्थित नोकरी करत नव्हत्या. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ त्या गैरहजर होत्या. चौकशी करण्यात आली होती. याच वैयक्तिक द्वेषापोटी त्यांनी ही खोटी तक्रार दिली आहे", असे महात्मा गांधी विद्यामंदिरचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी सांगितले.