पत्नीचा अपघाती तर पतीचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:53+5:302021-03-31T04:30:53+5:30

सारंगखेडा येथील अविनाश दर्यावसिंग जमादार (राजपूत) (४२) यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने सुरत येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर ...

Wife's accident and husband's death by corona | पत्नीचा अपघाती तर पतीचा कोरोनाने मृत्यू

पत्नीचा अपघाती तर पतीचा कोरोनाने मृत्यू

सारंगखेडा येथील अविनाश दर्यावसिंग जमादार (राजपूत) (४२) यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने सुरत येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना २८ मार्च रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ४ मार्च रोजी अविनाश हे आपली पत्नी रिंकू व मुलगा जयेश यांच्यासोबत दोंडाईचाहून चुलत शालकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी विरवाडे, ता. चोपडा येथे जात असताना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावाजवळ मोटारसायकलीसमोर कुत्रा आडवा गेल्याने अपघात झाला. त्यात अविनाश यांची पत्नी रिंकू जमादार मोटारसायकलवरून पडल्याने जबर मार लागला होता. अविनाश व मुलगा जयेश यांना किरकोळ दुखापत झाली होती. रिंकू जमादार यांना चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यांच्यावर सारंगखेडा येथे ५ मार्च रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रिंकू यांच्या निधनानंतर महिन्याभराच्या आतच त्यांचे पती अविनाश यांचादेखील कोरोना होऊन उपचारादरम्यान सुरत येथे खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे जमादार कुटुंबावर डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे. अविनाश यांच्यावर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २९ मार्च रोजी सुरत येथेच कोविड नियमाप्रमाणे मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. अविनाश यांचा मोठा मुलगा जयेश आठवीत तर लहान मुलगा हर्षवर्धन सहावीत शिक्षण घेत आहे. महिन्याभराच्या आत या कुटुंबावर दुहेरी संकट ओढवल्याने सारंगखेडा व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Wife's accident and husband's death by corona