कुठे जल्लोष तर कुणाचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:27 PM2020-01-17T12:27:09+5:302020-01-17T12:27:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीनिमित्ताने ग्रामीण भागातील जनता तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमली होती. या निवडणुकीत ज्यांनी बाजी मारली त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला तर ज्यांना पदे मिळाली नाहीत त्यांच्या समर्थकांचा मात्र हिरमोड झाला. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वातावरण राजकीय चर्चांनी ढवळून निघाले होते.

Where the shouting and the harem of someone | कुठे जल्लोष तर कुणाचा हिरमोड

कुठे जल्लोष तर कुणाचा हिरमोड

Next

शहाद्यात भाजप
समर्थकांचा जल्लोष
शहादा : शहादा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या बायजाबाई भिल तर उपसभापतीपदी रवींद्र पाटील विजयी झाले. पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
सभापती व उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाला बहुमतासाठी एका सदस्याची तर काँग्रेसला तीन सदस्यांची आवश्यकता असल्याने दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली. दोन्ही गटांनी आपापले सदस्य सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे १४, काँग्रेसचे १२ तर राष्टÑवादी व भाकपचे प्रत्येकी एक सदस्य निवडून आले आहेत. गुरुवारी सभापती-उपसभापती निवडणुकीसाठी भाजपच सदस्य एकत्रितपणे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्यासोबत पंचायत समिती परिसरात दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे सदस्य दाखल झाले. या वेळी जि.प. सदस्य अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष हेमलाता शितोळे, गणेश पाटील, चंद्रकांत पाटील, नगरसेवक संदीप पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.
भाजप समर्थकांचा जल्लोष
सभापती व उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, नगरसेवक प्राचार्य मकरंद पाटील, जयप्रकाश पाटील, माजी नगरसेवक के.डी. पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले.
पाचव्या महिला सभापती
नवनियुक्त सभापती बायजाबाई भिल ह्या पंचायत समितीच्या अठराव्या सभापती असून पाचव्या महिला सभापती ठरल्या आहेत. यापूर्वी त्या जिल्हा परिषद सदस्य पद, लोणखेडा, ता.शहादा ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य म्हणून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभागी राहिल्या आहेत. यंदा त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली आहे. त्या सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांंच्या विश्वासू व मानस भगिनी आहेत.


नवापूर पंचायत समितीला लाभले उच्चशिक्षित सभापती
नवापूर : नवापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी रतिलाल रतन कोकणी तर उपसभापतीपदी अंशिता उदेसिंग गावीत यांची निवड झाली. नवापूर पंचायत समितीला उच्चशिक्षित सभापती लाभल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सभापती रतिलाल कोकणी व उपसभापती अंशिता गावीत यांनी आमदार शिरीष नाईक, काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष दिलीप नाईक, राया मावची, नगरसेवक आरीफ बलेसरिया,अय्युब बलेसरीया, तानाजी वळवी यांच्या उपस्थितीत पदाचा पदभार सांभाळला. नवनिर्वाचित सभापती-उपसभापती व पंचायत समिती सदस्यांचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी, हवालदार निजाम पाडवी, प्रशांत यादव व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रतिलाल कोकणी हे श्रावणी येथील रहिवाशी असून राज्यशास्त्र विषयात कला शाखेचे पदवीधर आहेत. श्रावणी येथे जिल्हा परिषद शिक्षक व शासकीय आश्रमशाळा बोरचक येथे त्यांनी शिक्षक म्हणून तीन वर्षे सेवा दिल्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची परिक्षा उत्तीर्ण होऊन ते सीमा शुल्क निरिक्षक झाले. औरंगाबाद विभागात २९ वर्षे सेवा दिल्यानंतर ते २०१३ मध्ये नंदुरबार येथे जी.एस.टी.चे जिल्हा अधीक्षक म्हणून रुजू झाले. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाट धरली. श्रावणी पंचायत समिती गणातून त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली व ते निवडून आले. उच्चशिक्षीत व प्रशासकीय अनुभव असलेले सभापती तालुक्याला मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.


तळोदा : भाजप-काँग्रेसचा
फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला
तळोदा : तळोदा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे यशवंत ठाकरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या लताबाई वळवी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. १० जागांपैकी भाजप व काँग्रेसला प्रत्येकी पाच-पाच जागा मिळाल्याने या पदांसाठी कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षांनी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला बनवून अडीच-अडीच वर्षे सभापतीपद घेण्याचे ठरविले आहे.
तळोदा पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप व काँग्रेस यांचे पाच-पाच सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती व उपसभापती या पदांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी भाजपचे अमोनी गणातील सदस्य यशवंत ठाकरे यांचाच एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता तर उपसभापती पदासाठी भाजपचे बोरद गणातील सदस्य विजयसिंग राजपूत व काँग्रेसकडून अंमलपाडा गणातील सदस्या लताबाई अर्जुन वळवी या दोघांनी नामांकन दाखल केले होते. अर्ज माघारीच्या मुदतीत राजपूत यांनी माघार घेतली. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार पंकज लोखंडे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत सभापतीपदी यशवंत ठाकरे तर उपसभापतीपदी लताबाई वळवी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बैठकीला विजयसिंग राजपूत, विक्रम पाडवी, दाज्या पावरा, सोनीबाई पाडवी, सुपीबाई ठाकरे, चंदन पवार, इलाबाई पवार व सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडीसाठी नायब तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांन सहायक म्हणून सहकार्य केले. पंचायत समितीच्या पदाधिकाºयांची बिनविरोध निवड झाल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
अडीच-अडीच वर्षांचा
भाजप काँग्रेसचा फार्म्युला...
दहा सदस्यीय तळोदा पंचायत समितीत भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी पाच-पाच सदस्य निवडून आल्यामुळे दोघांचे समसमान बलाबल झाले आहे. साहजिकच पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपद भाजप व काँग्रेसने अडीच-अडीच वर्षे घेण्याचे ठरविले आहे.

 

Web Title: Where the shouting and the harem of someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.