कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयनगर येथील आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST2021-03-13T04:55:57+5:302021-03-13T04:55:57+5:30

जयनगर : गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनसह शासनाने निर्बंध लावले आहेत. ...

Weekly market closed at Jayanagar on the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयनगर येथील आठवडे बाजार बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयनगर येथील आठवडे बाजार बंद

जयनगर : गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनसह शासनाने निर्बंध लावले आहेत. आता ग्रामीण भागापर्यंत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव पोहोचल्याने जयनगर येथील आठवडे बाजार गेल्या वर्षाप्रमाणे शासन आदेशान्वये पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेला आठवडे बाजार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात चालू करण्यात आला होता. त्यामुळे व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत होते. मात्र आता शासन आदेशान्वये पुन्हा एकदा आठवडे बाजार बंद करण्यात आल्याने भाजी विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शासनाच्या पुढील आदेश येईपर्यंत येथील आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गरज असेल तेव्हाच घरा बाहेर जाणे तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रारंभी कोरोना याेद्धांना लस देण्यात आली. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस या सारख्या कोरोना योद्धांना लस देण्यात आली. त्यानंतर आता शासनातर्फे ६० वर्षापुढील ज्येष्ठ व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार जयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जयनगर येथील ६० वर्षापुढील ज्येष्ठ व्यक्तींनी १३ तारखेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात आधार कार्ड, मोबाइल नंबर तसेच जन्म दाखलेचा पुरावा घेऊन नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Weekly market closed at Jayanagar on the backdrop of Corona