तीव्र चढ-उताराच्या रस्त्यावरुन पायपीट करीत आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:16 PM2020-10-21T21:16:00+5:302020-10-21T21:16:07+5:30

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धजापाणी हे गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतरही वंचित आहे. गावात ...

Water has to be piped from steep uphill roads | तीव्र चढ-उताराच्या रस्त्यावरुन पायपीट करीत आणावे लागते पाणी

तीव्र चढ-उताराच्या रस्त्यावरुन पायपीट करीत आणावे लागते पाणी

Next

हंसराज महाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील धजापाणी हे गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतरही वंचित आहे. गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसून त्या मिळविण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे.
सातपुड्याच्या कुशीत वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे १०० हून अधिक कुटूंब राहत असून येथे पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सोयींचा अभाव आहे. मालदापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धजापाणी गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  धजापाणी गावात पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा हातपंप किंवा कुपनलिका नसून नदीतील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाळ्यात नदीचे पाणी आटत असल्याने झरा खोदून नागरिकांना पाणी उपलब्ध करून घ्यावे लागते. पाण्यासाठी महिलांना खोल उत्तरावे लागत असून पाण्याचा हंडा भरून उंच टेकड्यावर महिलांना चढावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. एक-दोन विहीर असून दीड ते दोन किलोमीटरचे अंतर तीव्र चढ-उताराच्या टेकड्या पार करत पाणी आणावे लागते. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात पाण्यासाठी एवढी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची येथील ग्रामस्थांची शोकांतिका आहे.
वीज असून नसल्यासारखी
धजापाणी येथे निम्म्याहून अधिक गावात वीज नसल्याचे चित्र आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी तर गावात वीजच नव्हती. ग्रामस्थांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने गावात वीज पोहचविण्यात आली. परंतु त्याठिकाणी असणाऱ्या विविध पाड्यांवरील घरात वीज पोहोचली नसल्याने त्यांच्यासाठी वीज असून नसल्यासारखी आहे. काहींनी स्वतःचा खर्च करून लांब अंतरापर्यंत वायर टाकून वीज घरात आणली. परंतु ती अत्यंत खर्चिक बाब असल्याने प्रत्येकालाच ती परवडणारी नाही. केवळ गावात वीज पोहचविण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले असल्याची ग्रामस्थांची व्यथा आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभाव
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अनेक दुर्गम-अतिदुर्गम भागात थेट नर्मदा काठापर्यंत अपवाद वगळता अनेक गावात रस्ते, वीज व आरोग्य पोहोचवण्यात आली आहे. मात्र बोरदपासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर वसलेल्या धजापाणी गावात अद्याप मूलभूत सोयीसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे चित्र आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे तर या गावात विकासाची गंगा पोहचू शकाला नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शक्य   असून धजापाणी गावात पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

गावात रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांना केवळ आतापर्यंत आश्वासनेच देण्यात आली. मात्र ती पूर्ण करण्यासाठी कोणाकडून प्रयत्न झाले नाहीत. गावात सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांच्या विकासाला चालना मिळेल.
-गोरख पावरा, 
ग्रामस्थ, धजापाणी, ता.तळोदा.
गावात सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या पूर्तता करून गावाचा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.
-करुणा पावरा, 
सरपंच, धजापाणी, ता.तळोदा.

Web Title: Water has to be piped from steep uphill roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.