जिल्ह्यातील वाळू ठेके रखडल्याने कोट्यवधींच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:34+5:302021-05-20T04:32:34+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू ठेके रखडले आहेत. यंदा तीन घाट निश्चित करण्यात आले. पैकी दोन घाटांचा लिलाव करण्यात आला. ...

Water on crores of revenue due to delay in sand contracts in the district | जिल्ह्यातील वाळू ठेके रखडल्याने कोट्यवधींच्या महसुलावर पाणी

जिल्ह्यातील वाळू ठेके रखडल्याने कोट्यवधींच्या महसुलावर पाणी

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू ठेके रखडले आहेत. यंदा तीन घाट निश्चित करण्यात आले. पैकी दोन घाटांचा लिलाव करण्यात आला. एकाचे पैसे भरून ते परत घेण्याची वेळ आली, तर दुसऱ्या घाटाचा लिलाव झाला. परंतु, पैसेच भरले गेले नाहीत. तिसऱ्या घाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मात्र शासनाचा कोट्यवधींचा महसूल यंदा बुडाला आहे.

जिल्ह्यात तापी, गोमाई, रंगावली या नदींमध्ये एकूण ३१ वाळू घाट आहेत. त्यातील अनेक घाट हे पर्यावरण मूल्यांकनात अडकले होते. यंदा तापी नदीवरील कुढावद तर्फे सारंगखेडा, कौठळ व टेंभा या गाव शिवारातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात आली. त्यातील कौठळचा घाट हा दोन कोटी ९७ लाखांत गेला. त्याचे पैसेही भरण्यात आले. परंतु, घाटात पाणी असल्याचे कारण सांगून वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली नाही. अखेर ठेकेदाराने पैसे परत घेतले. दुसरा टेंभा घाटाचा लिलाव तीन कोटींत झाला. परंतु, ठेकेदाराने पैसेच भरले नाहीत. तिसऱ्या कुढावद घाटासाठी कुणीच निविदा भरली नाही.

दुसरीकडे जिल्ह्याच्या सीमेवरील गुजरातच्या हद्दीतून तापीमध्ये चार ते पाच ठेके आहेत. त्यातून लाखो ब्रास वाळू उपसा होत असून, त्याची वाहतूक जिल्ह्यातून बिनदिक्कत सुरू आहे. दररोज किमान ६० ते ७० वाहने जिल्ह्यातून नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात जातात. दरम्यान, गेल्या वर्षभरात ७० पेक्षा अधिक वाहनांवर नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यांत कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Water on crores of revenue due to delay in sand contracts in the district