१५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:03+5:302021-07-22T04:20:03+5:30

नंदुरबार : संभाव्य तिसरी लाट आलीच, तर आरोग्य कर्मचारी सज्ज आणि सुदृढ राहावा, यासाठी त्यांचे लसीकरण ...

Vaccination of 15,000 health workers | १५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

१५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

नंदुरबार : संभाव्य तिसरी लाट आलीच, तर आरोग्य कर्मचारी सज्ज आणि सुदृढ राहावा, यासाठी त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. यातून जिल्ह्यात आजघडीस १५ हजार आरोग्य तर ४१ हजार फ्रंटलाइन वर्कर्सचा पहिला डोस पूर्ण झाला असून दुसरा डोस निम्म्यापेक्षा अधिक जणांना दिला गेला आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या ११ हजार ९०० शासकीय कर्मचा-यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात वाढ होऊन ही संख्या सध्या १७ हजार ८४३ एवढी झाली असून यातील १५ हजार ६०७ जणांना लस देण्यात आली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी सर्वप्रथम आरोग्य कर्मचा-यांची निवड केली गेली होती. प्रारंभी सहा केंद्रांवर होणारे लसीकरण आता १०० पेक्षा अधिक केंद्रांमध्ये केले जात आहे. आरोग्य कर्मचा-यांपैकी १५ हजार कर्मचा-यांना पहिला तर आठ हजार कर्मचा-यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत केवळ दोन हजारांपेक्षा कमी हेल्थ केअर वर्कर्स पहिला डोस घेण्याचे शिल्लक असून येत्या काही दिवसांत त्यांची संख्याही पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात १०१ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सला पहिला डोस दिला गेला आहे.

कोरोनाकाळात अहाेरात्र हेल्थ केअर वर्कर्ससोबतच फ्रंटलाइन वर्कर्सनी कोरोनाबाधितांची सेवा केली. त्यामुळे लसीकरणासाठी शासनाकडून प्राधान्य देण्यात आलेे होते. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात कोरोना पुन्हा फोफावल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व कर्मचारी सक्षम राहतील.

-डाॅ. एन.डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार

Web Title: Vaccination of 15,000 health workers