लस घेणाऱ्याला दोन किलो तांदूळ व साखर वाटप करणार - आमदार राजेश पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:18+5:302021-05-09T04:31:18+5:30

शहादा : राज्यात आदिवासी बहुल जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. याला नंदुरबार जिल्हाही अपवाद नाही. ...

Two kg of rice and sugar will be distributed to vaccinators - MLA Rajesh Padvi | लस घेणाऱ्याला दोन किलो तांदूळ व साखर वाटप करणार - आमदार राजेश पाडवी

लस घेणाऱ्याला दोन किलो तांदूळ व साखर वाटप करणार - आमदार राजेश पाडवी

शहादा : राज्यात आदिवासी बहुल जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. याला नंदुरबार जिल्हाही अपवाद नाही. अधिकाधिक आदिवासी बांधवांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी भन्नाट कल्पना काढली असून, ४५ वर्षांच्या पुढील जे आदिवासी बांधव लस घेतील, त्यांना स्वखर्चाने दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर देण्याचा निर्णय आमदार पाडवी यांनी जाहीर केला आहे. त्याचा शुभारंभ ११ मे रोजी नांदे (ता. शहादा) येथे आयोजित केलेल्या लसीकरण कॅम्पमधून होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात विशेषतः तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यात आदिवासी लोकांच्या मनात लसीकरणाबाबत भीती असून, ग्रामीण भागात सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक आदी यंत्रणेने जनजागृती करूनही लसीकरण मोहिमेला अत्यंत अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आमदार राजेश पाडवी यांनी त्यांच्या शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात स्वत: जातीने खेडोपाडी भेट देऊन लोकांना लस किती फायद्याची व सुरक्षित आहे, लस घेतल्यानंतर कोरोना ९० टक्के होऊ शकत नाही किंवा झाल्यास सौम्य स्वरूपाचा होऊन रुग्ण दगावू शकत नाही, अशाप्रकारचे समुपदेशन त्यांनी ग्रामीण भागात केले व करत आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोक कोविड प्रतिबंधक लस घेत आहेत.

स्वकल्पनेतून जाहीर

आमदार राजेश पाडवी यांनी त्यांच्या संकल्पनेतून जे ४५ वर्षांपुढील आदिवासी बांधव-भगिनी लस घेतील, त्यांना दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर त्यांच्या स्वखर्चातून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. याचा शुभारंभ नांदे (ता. शहादा) येथे ११ मे रोजी आयोजित लसीकरणाच्या कार्यक्रमात होणार आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे व तांदूळ-साखरेचे पॅकेज घेऊन जावे, असे आवाहन केले आहे. यानंतर शहादा तालुक्यातील काही खेड्यांमध्ये व तळोदा तालुक्यातील वाल्हेरी, सोजरबार या पहाडालगतच्या गावात अशाप्रकारचे लसीकरणाचे कार्यक्रम आमदार पाडवी स्वत: राबविणार आहेत. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढवून आदिवासी बांधवांमधील लसीकरणाविषयी जो गैरसमज आहे, तो कमी होण्यास मदत होईल व अशाप्रकारे राज्यामधील लसीकरणाचे प्रमाणही वाढेल, असा विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केला.

Web Title: Two kg of rice and sugar will be distributed to vaccinators - MLA Rajesh Padvi