यंदा लेझीमवर पाय थिरकणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:36 IST2020-08-20T12:36:10+5:302020-08-20T12:36:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील गणेशोत्सवातील लेझीम नृत्याची लय यंदा दिसणार नाही. ढोल, ताशा यांचा गजरही ऐकायला मिळणार ...

This time, Lezim will not be shaken | यंदा लेझीमवर पाय थिरकणारच नाही

यंदा लेझीमवर पाय थिरकणारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारातील गणेशोत्सवातील लेझीम नृत्याची लय यंदा दिसणार नाही. ढोल, ताशा यांचा गजरही ऐकायला मिळणार नसल्याचे स्पष्टच आहे. कोरोनामुळे मिरवणुका रद्द झाल्याने मंडळ कार्यकर्त्यांंनी यंदा सराव देखील केला नाही.
नंदुरबारच्या गणेशोत्सवाच्या वेगळेपणा येथील लयबद्ध पद्धतीने खेळली जाणारी लेझीम एक वेगळे आकर्षण आहे. कालानुरूप बदल येत गेला असला तरी लय मात्र तीच आहे. पूर्वी गणेश मेळ्यांमध्ये होणारे लेझीमनृत्य विविध तालीम संघांमध्ये स्पर्धा करणारे ठरायचे. दोन पाऊलपासून ११ पाऊल लेझीम नंदुरबारची एक वेगळी ओळख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत जेवढीही मंडळे सहभागी होतात ते सर्व लेझीमच खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांची ही लेझीम नृत्य पहाण्याचीही मजा काही औरच असते.
यंदा मात्र या सर्व प्रकाराला फाटा दिला गेला आहे. कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर आलेली मर्यादा आणि त्या अनुषंगाने रद्द करण्यात आलेल्या मिरवणुका यामुळे यंदा ढोल, ताशे आणि त्यावर खेळण्यात येणारी लेझीम दिसणार नसल्याचे स्पष्ट आहे.
जुनी परंपरा कायम
लेझीम नृत्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी ढोल-ताशांऐवजी संभळ वाद्यावर ती खेळली जात असे. त्याची वेगळीच लय राहत होती. कालांतराने मोठे आवाज करणारे ताशे, ढोल आले. त्यांनी संभळची जागा घेतली. ढोल व ताशांच्या आवाजामुळे नृत्यात अधिकच जोश येऊ लागल्यामुळे ही वाद्ये तरुणांच्या पसंतीस उतरली आणी संभळ मागे पडले. आज प्रत्येक मंडळात कमीतकमी पाच ते सात ढोल व तेवढीच ताशे असतात. त्यांच्या ठेक्यावर लेझीम खेळली जाते. पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुका दोन ते अडीच दिवस चालत असे. त्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचे गट करून ठरावीक वेळासाठी ते लेझीम खेळत असत. त्यानंतर दुसरा गट लेझीम खेळण्यासाठी उतरत असे. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या शैली पहाण्याची मजाही येत असे. गेल्या काही वर्षांपासून ते चित्र राहिले नसल्याच दिसून येते.
डीजेच्या गर्दीतही लेझीम टिकून
सध्या डीजे, बॅन्जोचा जमाना असला तरी नंदुरबारातील गणेश मंडळांनी पर्यायाने तालीम संघांनी लेझीमची परंपरा टिकवून ठेवली आहे. प्रत्येक मंडळ ढोल, ताशे यांच्याशिवाय दुसरे वाद्य वाजवित नसतात. काही तालीमसंघाची तर खास लेझीम पथकेही आहेत.
या पथकांना जिल्ह्यातूनही विविध कार्यक्रमांसाठी मागणी असते. लेझीम शिकविणारेदेखील शहरात आहेत. त्यांना गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीपासून मंडळाच्या कार्यकर्त्याना शिकविण्यासाठी पाचारण केले जाते असते.
यंदा मात्र रात्रीच्या वेळी मंडळांकडून लेझीमचा सराव नाही, ढोल, ताशांचा सराव नाही की कुणी त्यांना शिकविणारे येत नाही. त्यामुळे मंडळांच्या परिसरात सध्या शांतता आहे. रात्रीची संचारबंदी असल्यामुळे आणि सजावट व आरासला यंदा फाटा असल्यामुळे कार्यकर्त्यांना उशीरापर्यंत थांबून तयारी करण्याचेही कष्ट राहिले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही मंडळांनी आपल्या नेहमीच्या जागेवर मंडप उभारून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रशासनाने यंदा गणेश मूर्ती स्थापना आणि विसर्जन मिरवणुका काढण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीपासून मंडळ कार्यकर्ते लेझीमचा सराव करीत असतात. यंदा मात्र हा सराव देखील बंद आहे.
विसर्जन मिरवणुकीत लेझीम खेळण्याचे युवकांमध्ये खास आकर्षण असते. त्यामुळे अनेकजण लेझीम शिकण्यासाठी या काळात प्रयत्न करतात.
नंदुरबारातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होणारी २५ पेक्षा अधीक मंडळांकडे लेझीम खेळणाऱ्या युवकांचे पथके आहेत.

Web Title: This time, Lezim will not be shaken