संस्थाचालकांकडून शिक्षकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:25 IST2020-02-20T12:25:22+5:302020-02-20T12:25:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा समज काही संस्थाचालकांनी करुन घेतल्याने शिक्षकांचा ...

Teachers beat teachers | संस्थाचालकांकडून शिक्षकांना मारहाण

संस्थाचालकांकडून शिक्षकांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा समज काही संस्थाचालकांनी करुन घेतल्याने शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर मानसिक व आर्थिक छळ होत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत़ याच प्रकारातून एका शाळेत संस्थाचालकांनी काहींना हाताशी धरुन शिक्षकांना विद्यार्थ्यांदेखत मारहाण केल्याची चर्चा सध्या सुरु झाली असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़
याबाबतचे वृत्त असे की, जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत शाळा सुरू असतांना अचानक तीन ते चार जण शाळेत आले. आणि शिक्षकांवर विविध आरोप करीत त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार विद्यार्थी डोळ्यासमोर पहात होते.
शाळेत एकुण नऊ शिक्षक त्यावेळी उपस्थित होते. त्यापैकी चार शिक्षकांना संबधीतांनी बेदम मारहाण केली. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षक तसे नाहीत असे सांगत होते. परंतु त्याची पर्वा न करता त्यांनी शिक्षकांना मारहाण सुरूच ठेवली. या घटनेत दोन शिक्षक गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ही बाब हळूहळू विविध शाळांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रातील वर्तूळात पसरताच या घटनेची एकच चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, हा वाद रात्री पोलिसांपर्यंत पोहचला होता. त्या ठिकाणी पोलिसांनी सर्वांची कानउघाडणी केली. मात्र संबधित व्यक्ती व संस्था चालकांनी या संदर्भात शिक्षकांशी समझोता करण्याचा प्रयत्न केल्याने शिक्षकांनी तक्रार मागे घेतली व प्रकरण सामोपचाराने मिटले. परंतु त्याची धगधग मात्र शैक्षणिक वर्तूळात सुरूच आहे.

Web Title: Teachers beat teachers