जिल्ह्यात दोन पाड्यांवर टँकर, तर ९२ टंचाईग्रस्तांवर गावामध्ये उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:33+5:302021-05-19T04:31:33+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळी स्थिर असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले आहे. यातून जिल्ह्यात यंदा ...

Tankers on two padas in the district, while measures on 92 scarcity victims in the village | जिल्ह्यात दोन पाड्यांवर टँकर, तर ९२ टंचाईग्रस्तांवर गावामध्ये उपाययोजना

जिल्ह्यात दोन पाड्यांवर टँकर, तर ९२ टंचाईग्रस्तांवर गावामध्ये उपाययोजना

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळी स्थिर असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले आहे. यातून जिल्ह्यात यंदा केवळ ९२ गावे आणि १८८ पाडे टंचाईग्रस्त असून, या गाव-पाड्यांसाठी टंचाई निवारण आराखड्यांतर्गत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गाव आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी यंदा दीड मीटरपेक्षा अधिक असली तरीही सातपुड्याच्या दुर्गम भागात धडगाव तालुक्यातील कुंडलचा गुगलमालपाडा आणि गाैऱ्याचा बोदलापाडा या दोन पाड्यांना यंदाही टँकर सुरू करण्यात आले आहेत. या पाड्यांवर १० वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टंचाई निवारण आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात २८८ विंधनविहिरींचे खोदकाम करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ग्रामपंचायतींकडून देण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार हे २८८ हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये यंदा पर्यायी व्यवस्था म्हणून ३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव देण्यात आले होते. यातील १० पेक्षा अधिक प्रस्ताव हे नंदुरबार तर उर्वरित प्रस्ताव हे शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील असून, त्यावर कामकाज सुरू करण्यात आले आहे. सोबत ४८ पाणी योजनांच्या प्रस्तावांवर कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Tankers on two padas in the district, while measures on 92 scarcity victims in the village