संपुर्ण संचारबंदीमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:02 IST2020-04-13T12:01:33+5:302020-04-13T12:02:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात ...

Shocked due to complete communication | संपुर्ण संचारबंदीमुळे शुकशुकाट

संपुर्ण संचारबंदीमुळे शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दवाखाना व औषध खरेदी व्यतिरिक्त कुणालाही रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे शहरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेड्स देखील लावले होते. शिवाय एसआरपीची तुकडीही तैणात केली आहे.
जिल्ह्यालगतच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर पुर्ण शुकशुकाट होता.
स्वयंस्फूर्त आणि सक्तीची...
तीन आठवड्यापूर्वी अर्थात २२ मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहानानुसार नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला होता. त्या दिवशी जसा शुकशुकाट होता तसाच शुकशुकाट रविवार, १२ एप्रिल रोजी दिसून आला. २३ मार्च पासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत होते. त्यामुळे वेळ ठरवून ती सकाळी ८ ते १२ करण्यात आली. तरीही गर्दीवर नियंत्रण राहत नव्हते. अखेर बाजारपेठ परिसरच सील करण्यात आल्याने त्यावर नियंत्रण मिळाले. परंतु रविवारी संपुर्ण संचारबंदी लागू करीत प्रशासनाने सक्तीने वागण्याचे ठरविल्याचे दिसून आले.
भाजीपाला, किराणाही बंद
रविवारी भाजीपाला विक्री, किराणा दुकान, फळ विक्री संपुर्णत: बंद करण्यात आली होती. केवळ दूध विक्री केंद्र ठराविक वेळेपुरते सुरू होते. औषधी दुकाने व हॉस्पीटल पुर्ण दिवस सुरू होते. पोलिसांनी शहरातील चारही प्रमुख चौफुलींवर बंदोबस्त तैणात केला होता. प्रत्येकाची चौकशी करूनच सोडले जात होते. ठिकठिकाणी आणि चौकाचौकात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. एसआरपीची तुकडीही ठिकठिकाणी तैणात करण्यात आली होती. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

धानोरा येथे पाहुणे म्हणून आलेल्या तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गावात आले होते. याबाबतची कुणकुण गावातील लोकांना लागल्यावर प्रशासनाला कळविण्यात आले. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तिघांना शोधून काढले. त्यांना नंदुरबार येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांचीही तपासणी करून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान इतरही गावांमध्ये असे कुणी पाहुणे आले असल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे. नागरिकांनी देखील सतर्क राहून बाहेरच्या व्यक्तींना येवू देवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Shocked due to complete communication