आदिवासी विकासमंत्र्यांचे सातपुडा प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST2021-02-21T04:59:39+5:302021-02-21T04:59:39+5:30

नंदुरबार : सातपुड्यातील भौतिक विकास म्हणजे एक आव्हानच. त्या भागातील भौगोलिक परिस्थिती ही विकासासाठी प्रतिकूल असल्याने त्या भागात रस्ते ...

Satpuda love of tribal development minister | आदिवासी विकासमंत्र्यांचे सातपुडा प्रेम

आदिवासी विकासमंत्र्यांचे सातपुडा प्रेम

नंदुरबार : सातपुड्यातील भौतिक विकास म्हणजे एक आव्हानच. त्या भागातील भौगोलिक परिस्थिती ही विकासासाठी प्रतिकूल असल्याने त्या भागात रस्ते व इतर मूलभूत सुविधा करणे म्हणजे जिकिरीची बाब. स्वातंत्र्यानंतर आजवरचा इतिहास पाहिल्यास काहीना काही मोठ्या घटना घडाव्या लागतात. त्याच वेळी एखादा मोठा विकास प्रकल्प मंजूर होतो. या भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणारा धडगाव रस्ता असो, चाँदसैली घाटाचा रस्ता असो, तोरणमाळ ते सावऱ्या दिगरचा रस्ता असो प्रत्येक घटनेला कुठला ना कुठला संदर्भ आहे. नुकताच माेठ्या वाजागाजाने भूमिपूजन झालेल्या नकट्या देव ते असली रस्ताही स्वत: आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी प्रतिष्ठेचा केल्याने तो रस्ताही साकारत आहे.

सातपुड्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम-अतिदुर्गम भागात आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर धडगाव हे तालुक्याचे ठिकाणदेखील मुख्य रस्त्याने जोडलेले नव्हते. स्व.ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना व जिल्ह्याचे नेते सुरूपसिंग नाईक हे मंत्री असताना त्यांनी धडगावला रस्ता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने या भागात आणून तेथील भौगोलिक परिस्थिती दाखविली होती. त्यावेळी शहादा-धडगाव रस्ता झाला. त्यानंतर सातपुड्यातील प्रमुख रस्ता म्हणजे जिल्हा मुख्यालय ते धडगावचे अंतर कमी करणारा चाँदसैली घाटाचा रस्तादेखील अशाच पद्धतीने झाला. सध्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी हे तेव्हा आमदार होते. त्यांनी ९० ते २००० या दशकात या रस्त्याचा पाठपुरावा करून तो प्रतिष्ठेचा केला. मात्र मध्ये निधी न मिळाल्याने काम रखडले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख हे धडगाव तालुक्यात घाटली व गौऱ्या येथील कुपोषणाच्या घटनेने पाहणीसाठी आले होते. त्या वेळी वेळात वेळ काढून के.सी. पाडवी यांनी आपल्या मतदार संघातील भाग असल्याने मुख्यमंत्र्यांजवळ वेळात वेळ काढून चाँदसैली घाटाचा रस्ता पाहणीच्या कार्यक्रमाचे आयत्या वेळी नियोजन केले. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी खास मुंबईहून बुलेटप्रूफ गाडी लाखभर खर्च करून मागविण्यात आली होती. या गाडीने जेव्हा चाँदसैली घाटाच्या रस्त्यावर मुख्यमंत्री गेले तेव्हा अवघ्या चार पाच किलोमीटरवरच मुख्यमंत्र्यांची ‘ती’ गाडी नादुरुस्त झाली. अवघड घाट व दगड-गोट्याच्या रस्त्यावर ही गाडी चालली नाही. शेवटी दुसऱ्या गाडीवर काही अंतर पर्यंत मुख्यमंत्र्यांना रस्ता दाखविला आणि त्यांनी त्याच वेळी त्या रस्त्यासाठी निधी दिला होता. तोरणमाळ ते सावऱ्या दिगर रस्त्याच्याही असाच इतिहास आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी खडकी येथील कुपोषणाच्या वेळी त्या भागातील परिस्थिती पाहून रस्ता मंजूर केला होता. अर्थात त्यानंतर सहा मुख्यमंत्री बदलल्यानंतरही रस्ता पूर्ण झाला नाही ही बाब वेगळी पण रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. आता नकट्या देव रस्तादेखील असाच प्रतिष्ठेचा ठरला आहे. असली हे विद्यमान आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचे गाव. विद्यार्थी दशेत के.सी. पाडवी यांनी या रस्त्यावरून शिक्षणासाठी तब्बल २८ किलोमीटरची पायपीट करीत होते. आता मंत्री झाल्यानंतर ज्या रस्त्यावरून आपण पायी जाऊन शिक्षण घेतले किमान तो रस्ता व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. आमदार असताना त्यांना ते शक्य झाले नाही पण मंत्री झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी हा रस्ता मंजूर केला असून, सुमारे १३ कोटी खर्चाचा हा रस्ता त्या भागातील अनेक आदिवासी पाडे व गावातील नागरिकांना सोयीचा ठरणार आहे. तळोदा, शहादा आणि धडगाव तालुक्यासाठी त्याचा फायदा होईल. के.सी. पाडवी यांनी आपल्या गावाचा पूलदेखील विधानसभेत असाच प्रतिष्ठेचा करून मंजूर केला होता. आमदार झाल्यानंतर पहिल्याचवेळी त्यांनी विधानसभेत असे भाषण केले की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधानसभेतच त्यांच्या असली या गावाला पूल देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काही घटना, दुर्घटनांचा संदर्भ आणि काही नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे सातपुड्यातील विकास रडत-रखडत पुढे जात आहे हे मात्र निश्चित.

Web Title: Satpuda love of tribal development minister