उत्साहींच्या आगाऊपणामुळे रेल्वे हेल्पलाइनवर वाढतोय सुरक्षेचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:53+5:302021-02-12T04:29:53+5:30

रेल्वेच्या हेल्पलाइनवर दिवसभरात किमान १०० च्या जवळपास काॅल येतात. यातील काही काॅल्स हे केवळ मजा म्हणून केले जात असल्याचे ...

Safety stress on railway helpline is increasing due to enthusiastic advance | उत्साहींच्या आगाऊपणामुळे रेल्वे हेल्पलाइनवर वाढतोय सुरक्षेचा ताण

उत्साहींच्या आगाऊपणामुळे रेल्वे हेल्पलाइनवर वाढतोय सुरक्षेचा ताण

रेल्वेच्या हेल्पलाइनवर दिवसभरात किमान १०० च्या जवळपास काॅल येतात. यातील काही काॅल्स हे केवळ मजा म्हणून केले जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. मदतीसह रेल्वेगाड्यांच्या वेळा आणि चाैकशीसाठी मोठ्या संख्येने काॅल येत असल्याची माहिती देण्यात आली. नंदुरबार शहरासोबत जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून संपर्क केला जात असल्याचे सांगण्यात आले. नवापूर ते रनाळे दरम्यानच्या रेल्वेरुळावर अपघात घडण्यासह एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर माहिती विचारण्यासाठीही याच क्रमांकाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. परंतु अनेकवेळा या हेल्पलाइनवर प्रतिसाद मिळत नसल्याची माहितीही देण्यात आली आहे.

लाॅकडाऊन काळातस्थानकावर मिळणाऱ्या वडे आणि भजी यांच्या डिलीव्हरीसाठी चाैकशांचे फोन

नंदुरबार रेल्वेस्थानकात स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक नसल्याने स्टेशनमास्टर केबीनमध्येच ठेवलेल्या दूरध्वनीचा क्रमांक हेल्पलाइन म्हणून वापरण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याची गरज असते. परंतु नंदुरबार रेल्वेस्थानकावर तशी सोय नसल्याने स्टेनशमास्टरच उत्तरे देतात. स्टेशन मास्टर दुसऱ्या ठिकाणी व्यस्त झाल्यास हा फोन वाजून-वाजून बंद होतो. यामुळे नागरीकही त्रस्त होत आहेत. दरम्यान, लाॅकडाऊन काळात मात्र काहींनी हद्दच पार केल्याचे सांगण्यात आले. रेल्वे वाहतूक बंद असली तरी स्टेशन सुरू असल्याने तेथील कँटीन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक जण येथे संपर्क करत जेवण, वडे, भजे यांची मागणी करत असल्याचे सांगण्यात आले.

मदतीपेक्षा चाैकशीसाठी काॅल्स अधिक

रेल्वेतील रिझर्व्हेशन आणि रेल्वेगाड्या यांची चाैकशी करण्यासाठी सर्वाधिक काॅल्स आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. यात प्रामुख्याने गाड्या कधी सुरू होणार, विशेष रेल्वे गाड्या यांची माहिती विचारली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. कोविड रेल्वेगाड्यांची माहिती घेण्यासाठी सर्वाधिक काॅल्स आले.

सुरत येथील कार्यालयात संपर्क करण्याची सूचना

दरम्यान, रेल्वेस्थानकातील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, हेल्पलाइनबाबत सुरत येथून माहिती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नंदुरबार येथे स्थानकाचा क्रमांक हेल्पलाइन असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Safety stress on railway helpline is increasing due to enthusiastic advance