जिल्हाभरात जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:09 IST2020-06-27T12:09:21+5:302020-06-27T12:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाने हजेरी लावली. ...

Presence of heavy rains across the district | जिल्हाभरात जोरदार पावसाची हजेरी

जिल्हाभरात जोरदार पावसाची हजेरी


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाने हजेरी लावली. काही भागात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या चमचमाटात पावसाला सुरुवात झाली. थेट नवापूर ते शिरपूर तालुक्याच्या सिमेपर्यंतच्या पट्टयात पावसाचा जोर होता. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने व त्यानंतर मान्सूच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या होत्या. आतापर्यंत एकुण ४५ टक्के भागात पेरण्या झाल्या आहेत. काही भागातील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता.
शुक्रवारी सायंकाळी मात्र नवापूर, नंदुरबार, शहादा तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ढग जमा होऊन गडगडाटासह आणि विजांच्या चमचमाटासह पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशीरापर्यंत अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होता.
या पावसामुळे उर्वरित पेरण्यांना देखील वेग येणार आहे.
गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा आणि असह्य उकाड्याने जिल्हावासीयांना हैराण केले होते. आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला.
वीज पुरवठा खंडित
सायंकाळी पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशीरापर्यंत अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होता. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीने प्रयत्न सुरू केला होता.

Web Title: Presence of heavy rains across the district