तळोदा पंचायत समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:51+5:302021-07-28T04:31:51+5:30

सभेच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती यशवंत ठाकरे होते. गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. ग्रामीण भागात महिनाभरापासून ...

Meeting of Taloda Panchayat Samiti | तळोदा पंचायत समितीची सभा

तळोदा पंचायत समितीची सभा

सभेच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती यशवंत ठाकरे होते. गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. ग्रामीण भागात महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण नसताना बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाने असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. शहरी भागात बससेवा सुरू झाली असताना ग्रामीण भागात का होत नाही असा जाब सदस्यांनी विचारला. आता शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबविण्यासाठी तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र सभेला एस.टी. महामंडळाचे अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

रापापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हडंबा पाड्यात व खर्डी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लक्कडकोट गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावांमधील नागरिकांना विजेअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावांना वीज कंपनीने तातडीने विजेची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र पंचायत समितीच्या सभेला एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वन विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सभेला पं.स. उपसभापती लताबाई अर्जुन वळवी, पंचायत समितीचे सदस्य, सर्व विभागाचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Meeting of Taloda Panchayat Samiti