डोकेउठाड उमेदवारांना नेत्यांनी ठेवले गॅसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:03+5:302021-07-01T04:22:03+5:30

दुहेरी निष्ठा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी गेल्या दीड वर्षात नेत्यांच्या नाकीनऊ आणले होते. आता ...

Leaders put blunt candidates on gas | डोकेउठाड उमेदवारांना नेत्यांनी ठेवले गॅसवर

डोकेउठाड उमेदवारांना नेत्यांनी ठेवले गॅसवर

दुहेरी निष्ठा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी गेल्या दीड वर्षात नेत्यांच्या नाकीनऊ आणले होते. आता तेच सदस्य पोटनिवडणुकीत पुन्हा तिकीट मागत असल्याने नेत्यांनी अशांना चार हात लांब ठेवत गॅसवर ठेवले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा इच्छुकांनी देव पाण्यात ठेवून सकाळी सात वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत नेत्याच्या घराच्या परिसरातच रेंगाळणे सुरू ठेवले आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी अनेक उमेदवारांनी पक्ष नेत्यांवर निष्ठा दाखवत उमेदवारी मिळविली होती. एकदाचे निवडून आल्यावर अशा सदस्यांनी आपल्या नेत्यासह विरोधी पक्षातील नेत्याकडेही निष्ठा ठेवली. शिवाय अनेक सदस्य हाणामारी, वादविवाद यात माहिर झाले होते. त्यामुळे संबंधित नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. आता असे सदस्यच पुन्हा पोटनिवडणुकीत उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे अशांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ नेत्यांना आली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी असे उमेदवार नेत्यांची मनधरणी करीत आहेत. त्यासाठी विविध माध्यमातून नेत्यांकडे आपली दुकान लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु नेते अशांना चार हात लांब ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांची घालमेल वाढली आहे. आपला प्रतिस्पर्धी येऊन सेटिंग करून जाऊ नये यासाठी देखील संबंधित इच्छुक उमेदवार किंवा त्यांचा पंटर नेत्याच्या घराजवळच घुटमळत आहेत. त्यासाठी सकाळी सात वाजेपासूनच नेत्याच्या दारी हजेरी लावली जात असून रात्री दहा वाजेपर्यंत ठाण मांडून राहत आहेत. अशा इच्छुकांची केविलवाणी धडपड मात्र अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. -मनोज शेलार, नंदुरबार.

Web Title: Leaders put blunt candidates on gas