९५ हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:00 PM2020-09-25T13:00:22+5:302020-09-25T13:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी एकाच दिवसात ९५ हजार ३९१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण दोन लाख ९५ हजार २५८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, एएनएम आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक व्यक्तीचा ताप आणि आक्सिजन पातळी मोजण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्यास अन्य आजार असल्यास त्याची नोंद घेण्याबरोबरच कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
एकूण ४८२ पथकामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून आज २२ हजार १५६ घरांना भेटी देण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ६७ हजारापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील ५६ हजार ३५१, अक्कलकुवा २२ हजार ८१२, धडगाव ४८ हजार ४८४, नवापूर ६० हजार ८५६, शहादा ६९ हजार ७१० आणि तळोदा तालुक्यातील ३७ हजार ४५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तातडीने स्वॅब तपासणी करून त्यांना कोविड केअर सेंटरला संदर्भित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी खंडीत होण्यात मदत होऊ शकेल.
जि.प.सीइओंची भेट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नवापूर तालुक्यातील मोठे कडवान येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांना मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, सरपंच बंधू गावीत उपस्थित होते. गौडा यांनी आॅक्सिमीटरद्वारे आॅक्सिजन पातळी मोजणे व थर्मल गनच्या योग्य वापराविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकांची नीट नोंद घ्यावी, आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.