नंदुरबारात राबविणार आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:59 AM2020-06-29T11:59:01+5:302020-06-29T11:59:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोरोना प्रादुर्भावला अटकाव व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. मौलवींची बैठक, ...

Health survey campaign to be implemented in Nandurbar | नंदुरबारात राबविणार आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम

नंदुरबारात राबविणार आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील कोरोना प्रादुर्भावला अटकाव व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. मौलवींची बैठक, आशा सेविकांचा मेळावा, शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे. संपुर्ण शहरात सर्व्हेक्षण मोहिम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नंदुरबार शहरात आहेत. सद्य स्थितीत नंदुरबारातील ५० पेक्षा अधीक रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने घेऊन उपाययोजनांना गती दिली आहे.
मौलवींची बैठक
रविवारी पालिका सभागृहात शहरातील सर्व मौलवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड, पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध सुचना संबधितांना देण्यात आल्या. विवाह समारंभात ५० पेक्षा अधीकजण व अंत्ययात्रेत २० पेक्षा अधीक जण सहभागी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी समाजात जनजागृती करावी. कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास प्रशासनास कळवावे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य द्यावे. मास्क वापरावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गंभीर आजारी व्यक्तींना बाहेर निघू देवू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
माहिती संकलीत करणार
शहरात सर्व्हे करून माहिती संकलीत करण्याच्या सुचना आशा सेविकांना देण्यात आल्या. शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकांना त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. घरोघरी जाऊन नागरिकांच्या आजारासंदर्भात माहिती संकलीत करण्यात येणार आहे. त्यात कुटूंबातील सदस्यांची संख्या, १० वर्षाखालील लहान मुल व ६० वर्षावरील वयोवृद्ध व्यक्तींची संख्या, त्यांना असलेले आजार व त्याबाबत माहिती संकलीत करण्यात येणार आहे. संपुर्ण शहरात सर्व्हेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
ध्वनीक्षेपकाद्वारे जागृती
पालिकेतर्फे शहरात रिक्षावर ध्वनीक्षेपक लाऊन जनजागृती केली जात आहे. याशिवाय सकाळी घंटा गाडींवर देखील अशा पद्धतीने ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. त्यात बाजाराच्या ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, विनाकारण बाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क किंवा रुमाल बांधावा यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी देखील वेळोवेळी जनतेला आवाहन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


पालिका हद्दीत सकाळी कचरा संकलनासाठी घंटागाडीचा सर्वच भागात वापर केला जातो. त्यामुळे या घंटागाडींवर आधीच ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. या ध्वनीक्षेपकात आता कोवीड जनजागृतीसंदर्भात संदेश दिले जात आहे. सकाळी-सकाळी जनजागृतीपर संदेश कानावर पडत असल्यामुळे त्याच्या परिणामही चांगला दिसून येत आहे.

Web Title: Health survey campaign to be implemented in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.