Guruji's 'Guru Mantra' was the illumination on the corona | गुरुजींच्या ‘गुरुमंत्रा’ने होतेय कोरोनावर प्रबोधन

गुरुजींच्या ‘गुरुमंत्रा’ने होतेय कोरोनावर प्रबोधन

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाने साऱ्या जगाला हतबल केले असले तरी त्यावरही मात करत वेगवेगळ्या अभिनव प्रयोगाने दैनंदिन जीवनातील कामे सुलभ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे़ जिल्हा शिक्षण विभागाने याच पार्श्वभूमीवर राबवलेला गुरुमंत्र आणि स्टडी फ्रॉम होम या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी त्यात रमले असून बौद्धिक ज्ञानार्जनाबरोबरच कोरोनाची जनजागृतीही सुरु झाली आहे़
कोरोना या विषाणूजन्य आजाराने सर्वांनाच घरात बांधून ठेवले आहे़ त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली असून परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत़ परंतू सुट्या असल्या तरी त्याचा चांगला सदुपयोग करुन विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाशी जुळवून ठेवण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे़ त्यातूनच स्टडी फ्रॉम होमची संकल्पना साकारली असून राज्यात विविध ठिकाणी हा उपक्रम सुरु आहे़ नंदुरबार जिल्ह्यातही या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे़ या संदर्भात जिल्हा शिक्षण अधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मुख्याध्यापकांना पत्र देऊन उपक्रम राबवण्याबाबत आवाहन केले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील १८८ माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रतिसाद देऊन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे़ जवळपास सर्वच शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करुन विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे अभ्यासक्रमासंदर्भातील मार्गदर्शन करतात़ त्यात विशेषत: बोधकथा, विज्ञानातील प्रयोग, सामान्य ज्ञान संदर्भातील प्रश्न, मराठी, इंग्रजी, गणित विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देतात व त्यांच्याकडून सोडवून घेतात़
स्टडी फ्रॉम होमप्रमाणेच ‘गुरुमंत्रा’चा नवीन उपक्रम जिल्हा शिक्षण विभागाने सुरु केला आहे़ या उपक्रमानुसार रोज सर्व शिक्षक आपल्या वर्गातील किमान १० विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या पालकांना मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यातून कोरोना आजारावर जनजागृतीचे उपाययोजना सांगतात़ हा आजार पसरू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते सांगतात, शिवाय विद्यार्थी घरी अभ्यास करतो किंवा नाही त्याचा अभ्यासक्रमासंदर्भातील माहिती व अडचणी पालकांकडून जाणून घेतात़ या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे़
दोन्ही उपक्रमांसंदर्भात प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक रोज व्हॉटसअ‍ॅपद्वरे जिल्हा शिक्षण अधिकारी यांना अहवाल सादर करत आहेत़ या उपक्रमात जवळपास १ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत़ जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण घेणारे एकूण १ लाख ९७ हजार विद्यार्थी आहेत़ त्यापैकी बारावीचे १६ हजार ५०० व दहावीच २२ हजार विद्यार्थी वगळता १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत व्हाटसअपद्वारे रोज अभ्यासक्रम व जनजागृतीचे संदेश देण्याचे शिक्षण विभागाचे उद्दीष्ट्य आहे़ तथापि ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने अथवा संपर्काचे साधन नसल्याने अडथळे आहेत़ पण सध्यस्थितीत आठवडाभरात जवळपास एक लाख विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे़


स्टडी फ्रॉम होम या उपक्रमात सुरुवातीला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी भिती होती़ परंतू शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी त्यासाठी प्रयत्न केले़ पाहता पाहता रोज अनेक ग्रुप तयार झाले आणि खरोखरच एक चांगला उपक्रम त्यातून सुरु झाला़ आज १ लाखाहून अधिक विद्यार्थी जोडले गेले असून त्यांना शिक्षक व्हॉेटसअ‍ॅपद्वारे अभ्यासक्रम देतात़ त्याला विद्यार्थीही प्रतिसाद देत आहेत़ केवळ अभ्यासक्रमच नव्हे तर विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटू नये यासाठी बोधकथा व विज्ञानाचे अभिनव प्रयोग असे विद्यार्थ्यांना आवडतील अशा बाबीही अभ्यासक्रमात देण्याच्या सूचना आपण केल्या आहेत़ रोज मुख्याध्यापकांकडून त्याचा प्रतिसाद मिळत आहे़
-मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नंदुरबाऱ


मार्च ते जून पर्यंतचा कालावधी तसा मोठा आहे़ या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राशी बांधून ठेवणे आव्हान होते़ ते काम या उपक्रमातून सोपे झाले आहे़
-पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ


शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व मुख्याध्यापक हा उपक्रम राबवित असून विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता़ शिक्षकांनाही कामाचे समाधान मिळत आहे़
-मुकेश पाटील, अध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ

Web Title: Guruji's 'Guru Mantra' was the illumination on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.