पालिका प्रशासनाशी चर्चा करूनच रस्त्याचे पुढील काम करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:32 AM2021-02-24T04:32:56+5:302021-02-24T04:32:56+5:30

मंगळवारी ‘लोकमत’मध्ये कलसाडी ते मालकातर रस्ता तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे होत नसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ...

Further work on the road needs to be done only after discussing with the municipal administration | पालिका प्रशासनाशी चर्चा करूनच रस्त्याचे पुढील काम करणे गरजेचे

पालिका प्रशासनाशी चर्चा करूनच रस्त्याचे पुढील काम करणे गरजेचे

Next

मंगळवारी ‘लोकमत’मध्ये कलसाडी ते मालकातर रस्ता तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे होत नसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मांडताना मुख्याधिकारी राहुल वाघ म्हणाले की, सदर महामार्ग हा शहादा शहरातून जाणार आहे. यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिरसा मुंडा चौक हा भाग काँक्रिटीकरण तर त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पाडळदा चौफुली असा मार्ग असून येथे डांबरीकरण केले जाणार आहे. हे दोन्ही महत्त्वाचे भाग असून कृती व विकास आराखड्यातील नियम व तरतुदीनुसार भविष्यातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या रस्त्याची निर्मिती करणे आवश्यक आहे.

पालिका हद्दीतील रस्त्यांची निर्मिती ही विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी लक्षात घेऊन केली पाहिजे. त्याचप्रमाणे संबंधित रस्त्याची लांबी व रुंदी योग्य प्रकारे असणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या निर्मितीच्या सुरुवातीला पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडे या महामार्गाचे नकाशे व आराखडे याची मागणी करूनही त्याची पूर्तता झालेली नाही. त्याचप्रमाणे दोन वेळा याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिरसा मुंडा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले आहे. ठेकेदार अथवा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत योग्य प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीची मागणी करूनही संबंधित बैठक झालेली नाही. परिणामी कुठल्याही ठोस चर्चेअंती एकतर्फी या रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू आहे.

भविष्यातील रहदारी व वाहनांची संख्या लक्षात घेता हा शहरातून बाहेर जाणारा मुख्य मार्ग असल्याने या मार्गाची रुंदी योग्य प्रकारे असावी. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारी या योग्य दर्जाच्या असाव्यात. सध्या शहादा न्यायालय व बसस्थानकाच्या कंपाउंडपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारींची निर्मिती केली जात आहे, ती योग्य प्रकारची नाही. २०१९ मधील पावसाळ्यातील पूरस्थिती लक्षात घेता या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पावसाचे पाणी न्यायालय परिसरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात न्यायालयीन फायली व कागदपत्रांचे नुकसान झाले होते. या रस्त्यांची निर्मिती करताना भूतकाळात घडलेल्या या घटनांचा विचार करून भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची तरतूद करूनच रस्त्यांची निर्मिती करणे आवश्यक असतानाही ठेकेदार त्याच्या हिशेबाने काम करीत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याने या रस्त्याच्या निर्मितीनंतर पावसाळ्यात अनेक समस्या होण्याची शक्यता असल्याने यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा याचे दुष्परिणाम भविष्यात शहादेकरांना सोसावे लागतील.

दरम्यान, संबंधित ठेकेदाराने बसस्थानकापासून ते न्यायालयासमोरपर्यंत एका बाजूला गटारीसाठी खोदकाम केलेले आहे. ठेकेदाराने या गटारीची निर्मिती तत्काळ करणे आवश्यक असतानाही गेल्या महिनाभरापासून कुठलेही सबळ कारण नसताना अथवा कुठलीही पूर्वसूचना न देता या गटारींची निर्मिती थांबवली असल्याने हा भाग अपघातप्रवण क्षेत्र झालेला आहे. मुळात येथील धावपट्टीची रुंदी ही विकास आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे नसल्याने अनेकांनी याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते तर दुसऱ्या बाजूला गटारीसाठी खोल खड्डा असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक वाहनासकट या खड्ड्यात पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ठेकेदाराने या गटारींची निर्मिती करताना कुठलेही बॅरिकेड्स अथवा तत्सम उपाययोजना केली नसल्याने भविष्यात या भागात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संपूर्ण रस्त्यादरम्यान असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन निश्चितच सहकार्य करेल. यासाठी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेशी चर्चा केली पाहिजे. मात्र या मार्गाची निर्मिती करताना विकास आराखड्यातील तरतुदीनुसार झाली पाहिजे अन्यथा हा रस्ता अनेक समस्यांचे माहेरघर ठरेल. सध्या एका बाजूला गटारीचे काम थांबले असल्याने या भागात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने पालिका प्रशासनाशी चर्चा करूनच याबाबत योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.

- राहुल वाघ, मुख्याधिकारी, शहादा नगरपालिका

Web Title: Further work on the road needs to be done only after discussing with the municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.