खताच्या दरांबाबत जिल्हाभरातील गाेंधळाने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:15+5:302021-05-24T04:29:15+5:30

नंदुरबार : यंदाच्या कृषी हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दर दुपटीने वाढले आहेत. हे दर शासनाने मागे घेण्याचे म्हटले असले ...

Farmers in the district are facing difficulties due to confusion over fertilizer prices | खताच्या दरांबाबत जिल्हाभरातील गाेंधळाने शेतकरी अडचणीत

खताच्या दरांबाबत जिल्हाभरातील गाेंधळाने शेतकरी अडचणीत

नंदुरबार : यंदाच्या कृषी हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दर दुपटीने वाढले आहेत. हे दर शासनाने मागे घेण्याचे म्हटले असले तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र नव्या दरांनुसार खत विक्री झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सुमारे तीन लाख हेक्टरवर होणाऱ्या खरीप पिकांच्या पेरण्यासाठी किमान एक लाख मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा अधिक खताचा साठा मागवण्यात येतो. यंदाही हे आवंटन प्राप्त होण्यास प्रारंभ झाला असतानाच केंद्र शासनाकडून खतांचे नवीन दर लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर ही दरवाढ मागे घेतली गेल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु यानंतरही अनेक ठिकाणी जुने दर टाळून नवीन दरांनुसार रासायनिक खतांची विक्री सुरू करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ, रासायिनक खत विक्रेते यांच्या दुकानांसमोर शुकशुकाट आहे. खतांचे वाढीव दरांबाबतचा हा गोंधळ मिटल्यावरच खत खरेदी करण्याचा निर्णय शेतक-यांनी घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान नंदुरबार शहर, तळोदा, शहादा, धडगाव, अक्कलकुवा या ठिकाणी चाैकशी केली असता, नवीन दराने खतांची विक्री सुरू असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून दरांबाबत योग्य ती माहिती दिली गेली नसल्याने हा प्रकार सुरू असल्याचे समजते. दरम्यान ग्रामीण भागात मात्र चिंता वाढल्या आहेत. यंदा पीक पेरा महागणार असल्याने लहान शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करत आहेत. मोठे शेतकरी हंगाम सुरु होण्यापूर्वी खताची खरेदी करुन साठा करण्यावर भर देतात. काहींनी नवीन दराने खरेदी केली आहे. यातून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. शासनाकडून जुन्या दराने विक्रीचे आदेश आल्यास वाढीव दरात खरेदी केलेल्या खताचे पैसे परत देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात सोमवारपासून खतांचे नवीन दर कृषी विभाग लागू करणार किंवा कसे याकडे लक्ष लागले आहे. खत उत्पादक कंपन्यांच्या आदेशांकडेही शेतकरी लक्ष ठेवून आहेत.

खत मुबलक

जिल्ह्यात ९६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा टप्प्याटप्प्याने येणार आहे. खतांचे दर कमी व्हावेत यासाठी शेतकरी तालुकास्तरावर निवेदने देत कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

खविसंचे ठराव

जिल्ह्यातील विविध भागात खतांचा पुरवठा करणाऱ्या खरेदी विक्री संघामध्ये खत विक्रीचे ठरावही झाले आहेत. या संघांमध्ये वाढीव दराने सध्या खतांची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान जिल्हा परिषद कृषी विभागाकडून सोमवारपासून दरांबाबत योग्य ती माहिती घेण्यात येणार आहे. राज्यशासनाचे दर व विक्रेत्यांचे दर यांची पडताळणी केली जाणार आहे. इफकोने यापूर्वीच जुन्या दरात रासायनिक खतांची विक्री करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु हे पत्र अद्याप जिल्ह्यात प्राप्त झालेले नसल्याचे समजते.

खतांच्या दरवाढीबाबतच संभ्रम यंदाही अडचणीचा ठरत आहे. अनेक ठिकाणी खतांची विक्री वाढीव दराने झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वाढीव दराने खतांची खरेदी केली आहे. त्यांना शासनाने वाढीव पैसे परत केले पाहिजेत. ग्रामीण भागात सध्या या प्रकाराने नाराजी आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वाढीव दराने रासायनिक खतांची विक्री होत आहे.

-सी.एन. पाटील,

नळवे, ता. नंदुरबार,

Web Title: Farmers in the district are facing difficulties due to confusion over fertilizer prices