पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:35+5:302021-07-07T04:37:35+5:30

तोरखेडा : शहादा तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जणूकाही दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी तालुक्यातील तोरखेडा, वडाळी व ...

Farmers are worried due to heavy rains | पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल

पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल

तोरखेडा : शहादा तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जणूकाही दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी तालुक्यातील तोरखेडा, वडाळी व सारंगखेडा परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांनी माना खाली टाकण्यास सुरूवात केली आहे.

नुकतेच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. तसेच दररोज उजाडणारा दिवस पाण्याविना कोरडा जात असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. येत्या चार-पाच दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे.

यंदा वेळेवरच मान्सूनचे आगमन होईल व तो सरासरीपेक्षा जास्त पडणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या अंदाजानुसार ७ जून ते १० जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाने सुरूवात करून दिली होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाला, असे समजून २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु ही पिके जमिनीवर येत नाहीत, तोच पावसाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यातच दररोज कडक उन्ह पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे. पिकांना वाचवण्यासाठी अनेक शेतकरी पाणी देऊन पिकांना वाचवण्याची धडपड करीत आहे. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमक्ष पिकाचे नुकसान पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही.

हजारो हेक्टरवरील पिकाच्या नुकसानीची शक्यता

पावसाअभावी अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली. अशा हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी खाली माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

Web Title: Farmers are worried due to heavy rains