कोरोनात बोगस डॉक्टरांची कमाई, कारवाई मात्र एकही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 13:21 IST2020-08-13T13:21:23+5:302020-08-13T13:21:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना काळात दुर्गम भागात बोगस डॉक्टरांनी चांगली कमाई केली. अनेक डॉक्टरांनी या काळात आपले ...

Earnings of bogus doctors in Corona, but no action | कोरोनात बोगस डॉक्टरांची कमाई, कारवाई मात्र एकही नाही

कोरोनात बोगस डॉक्टरांची कमाई, कारवाई मात्र एकही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना काळात दुर्गम भागात बोगस डॉक्टरांनी चांगली कमाई केली. अनेक डॉक्टरांनी या काळात आपले दवाखाने बंद ठेवले, रुग्ण तपासणीचे काम बंद ठेवल्याने अशा डॉक्टरांची चांदी झाली. दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यात एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात बोगस डॉक्टरांबाबत नेहमीच तक्रारी येतात. बोगस प्रमाणपत्र आणि डिग्रीच्या आधारे पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांचे दवाखाने चालत होते. परंतु गेल्या काही वर्षात नागरिकांमध्ये आलेली सजगता, वैद्यकीय सेवा पोहचल्याचा परिणाम यामुळे अशा डॉक्टरांची दुकानदारी बंद झाली. परंतु अद्यापही काहीजण या भागात व्यवसाय करतात.
कोरोनाच्या काळात अशा डॉक्टरांची मोठी कमाई झाली. अनेक मोठ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले. काहींनी रुग्ण तपासणीस टाळाटाळ केली. ग्रामिण आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या ड्युट्या इतर ठिकाणी लागल्या त्यामुळे साध्या आजारांवर उपचार करण्यासाठीही रुग्णांची फिरफिर होत होती. अशा वेळी बोगस डॉक्टरांची चांदी झाल्याचे चित्र होते.
गेल्या तीन ते चार महिन्यात जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडखे यांनी सांगितले. तशा प्रकारच्या तक्रारीही तालुकास्तरीय समितींकडे आलेल्या नव्हत्या असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुका स्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असलेली समिती असते. या समितीकडे तक्रार आल्यास चौकशी करून संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल केल जातो. याशिवाय जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. या समितीच्या माध्यमातून देखील बोगस डॉक्टरासंबधी निर्णय घेतले जात असतात.

गेल्या चार महिन्यात बोगस डॉक्टरांवर कारवाईची एकही केस झाली नाही. तालुका समितींकडे तक्रार आल्यावर लागलीच चौकशी करून गुन्हा दाखल केला जातो. कोरोनाच्या काळात बोगस डॉक्टरांबाबतच्या तक्रारी फारशा आल्या नाहीत.
-एन.डी.बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.

Web Title: Earnings of bogus doctors in Corona, but no action