कोविड योध्दे आरोग्य कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST2021-05-20T04:33:07+5:302021-05-20T04:33:07+5:30

गेल्या सोळा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. दिवस-रात्र सुमारे सोळा ते अठरा तास कामे करुन ...

Covid warriors waiting for salaries to health workers | कोविड योध्दे आरोग्य कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतिक्षा

कोविड योध्दे आरोग्य कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतिक्षा

गेल्या सोळा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. दिवस-रात्र सुमारे सोळा ते अठरा तास कामे करुन आरोग्य कर्मचारी कोरोनाशी दोन हात करुन लढा देत आहेत. या काळात शासनाने इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याची मुभा दिली तर दुसरीकडे आरोग्य कर्मचारी कोणतीही सुटी न घेता कार्यरत आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक बाजू ढासळत असल्याने गृहकर्ज, विमा हप्ते, दैनंदिन खर्च भागविणे कठीण होत असल्याने अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी कोविड कामात व्यस्त असतांना आर्थिक बाजु सांभाळतांना नाकीनऊ येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.

शासन ज्यांना कामावर बोलवत नाही त्यांचे वेतन नियमित होत आहेत, मात्र दुसरीकडे दिवस-रात्र राबराब राबून कोविड कामे करणारे आरोग्य कर्मचारी मात्र वेतन लवकर द्या, अशी आर्त हाक मारीत प्रशासनाला विनवण्या करीत आहेत. तरीही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. याबाबत प्रशासनाला वारंवार ही बाब निदर्शनास आणून देखील त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. दरमहा १५ तारखेच्या पुढेच वेतन होत आहेत. मार्च महिन्याचे वेतन तर 27 एप्रिल रोजी मिळाले. आता एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी 20 मे तारीख उजाडली तरी अजूनही प्रतीक्षाच आहे.

वेतन विलंब होऊ नये यासाठी शासनाने दरमहा एक तारखेला वेतन अदा व्हावे यासाठी नियम करुन दिला आहे. तसेच सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून विहीत मुदत ठरवून दिली आहे. मात्र कधीही या नियमांचे पालन होत नसल्याने एक तारखेला वेतन झालेले नाही. एक ना अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कर्मचाऱ्यांची अपेक्षाही नाही की दरमहा एक तारखेला वेतन व्हावे परंतू किमान पाच तारखेच्या आत वेतन झाले तरी कर्मचाऱ्यांना आनंद होईल, मात्र तेदेखील होत नाही. आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे वारंवार निवेदन देऊन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. वेतन विलंब होऊ नये यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढून वेतन दरमहा एक ते पाच तारखेच्या आत व्हावे यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Web Title: Covid warriors waiting for salaries to health workers