सलग दुसऱ्यावर्षी आषाढी एकादशीवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST2021-07-04T04:20:51+5:302021-07-04T04:20:51+5:30

जयनगर : मागील वर्षी कोरोना महामारीमुळे कडक लॉकडाऊन लागल्याने आषाढी एकादशीसाठी गावागावांमधून निघणाऱ्या दिंड्या रद्द झाल्यामुळे भक्तांना प्रत्यक्ष विठुरायाचे ...

Coronation on Ashadi Ekadashi for the second year in a row | सलग दुसऱ्यावर्षी आषाढी एकादशीवर कोरोनाचे सावट

सलग दुसऱ्यावर्षी आषाढी एकादशीवर कोरोनाचे सावट

जयनगर : मागील वर्षी कोरोना महामारीमुळे कडक लॉकडाऊन लागल्याने आषाढी एकादशीसाठी गावागावांमधून निघणाऱ्या दिंड्या रद्द झाल्यामुळे भक्तांना प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन घेता आले नाही. यावर्षीही सलग दुसऱ्यांदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे शासनाने निर्बंध लादल्याने भक्तांना दिंड्या तसेच विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.

२० तारखेला आषाढी एकादशी आहे. दरवर्षी एकादशीच्या १५ ते २० दिवस अगोदर शहादा तालुक्यातील जावदे, मंदाने, असलोद, लोंढरे, कहाटूळ, धांद्रे, वडाळी, कुकावल, जयनगरसह अनेक गावांतील भाविकांच्या दिंड्या पंढरपूरसाठी मोठ्या प्रमाणावर निघत असायच्या. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी दिंड्यांची वर्षानुवर्षे चालणारी परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.

दरवर्षी लागवड व पेरणी झाल्यावर शहादा तालुक्यातील अनेक भक्तगण शेतीची इतर कामे घरातील दुसऱ्या सदस्यांवर सोपवून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर दिंडीला जायचे. मात्र, यावर्षीही कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन होणार नसल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यशासनाने वारीच रद्द केल्याने सलग दुसऱ्या वर्षी वारकरी व विठ्ठल यांची भेट होणार नाही. दरवर्षी आषाढी एकादशीसाठी शहादा तालुक्यातील तसेच मध्यप्रदेश येथील अनेक भक्तांच्या दिंड्या जयनगरमार्गे पंढरपूरला जात असत. त्यामुळे दरवर्षी मध्यप्रदेशहून दोंडाईचामार्गे पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी रस्त्यांवर दिसायची. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही दिंड्या रद्द झाल्यामुळे लोकांनाही दिंड्यांच्या दर्शनाला मुकावे लागत आहे.

प्रतिपंढरपूरवरही कोरोनाचे सावट

शिरपूर तालुक्यातील बाळदे या गावाला विठ्ठलाचे छोटे मंदिर असून, खानदेशातले प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. येथेही जयनगरसह परिसरातील अनेक भाविक बाळदे येथे आषाढी एकादशीच्या दिवशी पायी दर्शनाला जात असत. हे ठिकाण शहाद्याहून जवळच असल्याने दर्शनासाठी तरूण मंडळींसोबत लहान मुले तसेच वृद्धांचाही समावेश असायचा. मात्र, येथेही भाविकांना सलग दुसऱ्या वर्षी दर्शनाला जाता येत नसल्याने भाविकांचा खूपच हिरमोड झाला आहे.

Web Title: Coronation on Ashadi Ekadashi for the second year in a row