कोरोना रुग्णालय - बिलांबाबत आल्या अवघ्या नऊ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:27+5:302021-05-09T04:31:27+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात २० खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेेत. रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारू नये, ...

Corona Hospital - Just nine complaints about bills | कोरोना रुग्णालय - बिलांबाबत आल्या अवघ्या नऊ तक्रारी

कोरोना रुग्णालय - बिलांबाबत आल्या अवघ्या नऊ तक्रारी

नंदुरबार : जिल्ह्यात २० खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेेत. रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारू नये, यासाठी स्थापन केलेल्या रुग्णालय तपासणी पथकाकडे दोन महिन्यांत नऊ तक्रारी आल्या. त्यांचे लागलीच निरसन करण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झाली असली तरी रुग्णालयांची अचानक तपासणी पथकांकडून केली जात आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी बिलासंदर्भात तक्रारी असल्यास थेट समितीकडे संपर्क साधणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात गेल्या महिन्यात अर्थात एप्रिलमध्ये रुग्णसंख्या अचानक वाढली होती. त्यामुळे कोरोना रुग्णांचा उपचारासाठी खासगी किंवा शासकीय रुग्णालयात देखील बेड मिळणे दुरापास्त झाले होते. अनेक रुग्णालयांनी तर आधी डिपॅाझिट भरा तरच रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल, असे अडवणुकीचे धोरणदेखील राबविले. शिवाय अंतिम बिलांबाबत देखील रुग्णांची अडवणूक झाली होती. या पार्श्वभूमीवर रुग्णालय तपासणी समितीकडे तक्रारी वाढल्या होत्या.

काय होत्या तक्रारी ?

समितीकडे आलेल्या तक्रारींमध्ये वाढीव बिलाबाबत रोष होता. त्यात अवाजवी बिल आकारणी केल्याचे म्हटले होते. त्यावर समितीने बिलांची पडताळणी करून संबंधित रुग्णालयांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणीच्या सूचना दिल्या. समितीच्या सूचनेनुसार संबंधित रुग्णालयांनी बिल आकारणी करून रुग्णांचे समाधान केले.

नंदुरबार व शहाद्यातील तक्रारी

नंदुरबार व शहादा येथील कोरोना रुग्णालयांबाबतच तक्रारी होत्या. नवापूर तालुक्यातून एकही तक्रार नव्हती. तळोदा व धडगाव तालुक्यात कोरोनावर उपचार करणारे एकही खासगी रुग्णालय नाही. नंदुरबारातील चार तर शहाद्यातील पाच तक्रारी होत्या. त्यापैकी दोन रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली तर सात रुग्णालयांना समज देण्यात आली.

अशी आहे समिती

समितीमध्ये सर्वच अधिकारी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. नोडल अधिकारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॅा. प्रवीणकुमार ठाकरे असून सदस्य म्हणून प्रा. डॅा गिरिश ठाकरे, प्रा. डॅा. निरव गोडे, प्रा. डॅा. हरीष वानखेडे, प्रा. डॅा. दीप्ती निमजे, प्रा.डॅा.अमरसिंग हजारे, प्रा. डॅा. रूपल गिरासे, प्रा. डॅा. आनंद जामकर, प्रा.डॅा.रवीराज नाईक, प्रा. डॅा. संजय गायकवाड, प्रा. डॅा. अमोल वाघमारे यांचा समावेश आहे.

दररोज भेटी

या समितीकडून तालुकानिहाय गट करून सदस्य खासगी रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करीत असतात. कुणा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांचा फोन किंवा तक्रार आल्यास त्याचे लागलीच निरसन करण्यासाठी प्रयत्न होतो.

Web Title: Corona Hospital - Just nine complaints about bills