कोरोनामुळे गरीब आदिवासींवर पुन्हा आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST2021-04-23T04:32:56+5:302021-04-23T04:32:56+5:30

■रोजगार देणाऱ्या रानमेव्याला यंदाही बाजारपेठ नाहीच लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : सातपुड्याच्या कुशीत आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून ...

Corona causes economic crisis again on poor tribals | कोरोनामुळे गरीब आदिवासींवर पुन्हा आर्थिक संकट

कोरोनामुळे गरीब आदिवासींवर पुन्हा आर्थिक संकट

■रोजगार देणाऱ्या रानमेव्याला यंदाही बाजारपेठ नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क

ब्राह्मणपुरी : सातपुड्याच्या कुशीत आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. या परिसरात असलेल्या जंगलातून दरवर्षी उन्हाळ्यात मिळणारा गोडगोड रानमेवा या आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून देणारा चांगला स्रोत ठरला आहे. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रानमेवा विकण्यासाठी बाजारपेठच उपलब्ध नाही.

यावर्षीही वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गोरगरीब आदिवासींना रानात पिकलेला रानमेवा विकण्यासाठी संचारबंदीमुळे बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांची मोठी अडचण झाली आहे. चांगला रोजगार मिळवून देणारा रानमेवा विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आदिवासींवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे.

साधारण एप्रिल ते मे महिन्यात गावरान आंबा, चारोळी, जांभूळ, आदी प्रकारच्या रानमेव्यांना बहर येतो. हा रानमेवा पिकला की, हेच आदिवासी बांधव मोठ्या मेहनतीने हा रानमेवा विकण्यासाठी आठवडा बाजारात येतात. आठवडा बाजारात रानमेव्याला चांगली किंमत मिळत असल्याने आदिवासींना आपला उदरनिर्वाह चालवणे सोपे जाते. सातपुड्यातील मुले तसेच नागरिक अद्यापही समाजाच्या मुख्य प्रवाहात न आलेल्या आदिवासी बांधवांची मुले, नागरिक उन्हाळ्यात सकाळीच रान गाठतात. रानातील पिकलेला रानमेवा मेहनतीने गोळा करून तो बाजारात विकण्यासाठी आणतात.

दोन पैसे जास्तीचे कमावून ही मंडळी आनंदाने घरी परततात. पुन्हा दुसऱ्या दिवशी ठरल्या क्रमाने ही मंडळी आपल्या कामाला लागतात. मागील काही वर्षातले हे चित्र कोरोना महामारीने पुरते थांबवले आहे.

आदिवासी मुले उन्हाळ्यातील रानमेव्याला मिळणाऱ्या चांगल्या किमतीमुळे आपल्या शिक्षणाचा बराचसा खर्च भागवतात. मात्र, यावर्षी आदिवासी नागरिकांना रानमेव्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारावर कोरोनाने पाणी फिरवल्याने आदिवासींवर आर्थिक संकट कोसळले आहे.

Web Title: Corona causes economic crisis again on poor tribals