साखर झोपेत असतांनाच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:36 PM2020-10-22T12:36:59+5:302020-10-22T12:37:07+5:30

नथ्थू जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : पहाटे दोन, अडीच वाजेची साखर झोपेत सर्व प्रवासी होते. अचानक काहीतर ठोकले ...

Add sugar while sleeping | साखर झोपेत असतांनाच काळाचा घाला

साखर झोपेत असतांनाच काळाचा घाला

Next

नथ्थू जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : पहाटे दोन, अडीच वाजेची साखर झोपेत सर्व प्रवासी होते. अचानक काहीतर ठोकले गेल्याचा आवाज झाला. काहींना जाग आली तर बस हेलकावे घेत खाली कोसळली. त्यानंतर काही क्षणातच कपाळ, हातपाय यांना प्रचंड वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर कळले की अपघात झाला असून कुठेतरी खोल दरीत आपण बससह पडलो आहोत. आजूबाजू किर्र अंधार होता. महामार्ग रहदारीचा असल्यामुळे लागलीच वरून मदतीसाठी स्टार्च आणि वाहनाचे दिवे चमकत होते. त्यामुळे लवकर मदत मिळेल या अपेक्षत मदतीसाठी धावाधाव करीत होतो. परंतु दुर्गम दरी असल्यामुळे मदत पोहचण्यात काही काळ गेला. ही आपबीती होती कोडाईबारी घाटातील जखमींची.   
जळगावकडून सुरतकडे जाणाऱ्या खाजगी बसला बुधवारी पहाटे कोंडाईबारी घाटात अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की बसचे दोन तुकडे झाले. शिवाय दरी खोल आणि दुर्गम असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले. परिणामी शेवटचा मृतदेह काढण्यात दुपारचे १२ वाजले होते. 
शुभम ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस (क्रमांक जी जे ०५ एव्ही ८५ ०१) ही नेहमीप्रमाणे सुरत जाण्यासाठी मंगळवारी रात्री जळगावहून निघाली. धुळेमार्गे बस साक्री पास केल्यानंतर कोंडाईचारी घाटात पहाटे दोन वाजेच्या सुमारास आली. घाटाच्या उताराच्या भागात ओव्हरटेक करतांना पुढे चालणाऱ्या दुसऱ्या बसला मागून धडक दिली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आही बस खोल दरीत कोसळली. 
बचावासाठी आरडाओरड
बस खोल दरीत कोसळली, परंतु त्याआधी दुसऱ्या बसला धडक दिल्याने ही बस कोसळल्याचे लक्षात आले. परिणामी लागलीच बचाव कार्यासाठी मदत मागता आली. परंतु खोल दरी आणि अंधार यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. दुसरीकडे जखमी झालेले बसमध्येच विव्हळत होते. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि परिसरातील गावातील लोकं धावून आल्यावर मदत कार्याला वेग      आला.
 या अपघाताची माहिती अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मोरकरंजा येथील खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील गावित यांना मिळाली. त्यांनी तात्काळ विसरवाडी व महामार्ग पोलीस मदत केंद्रास कळवले. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व महामार्ग पोलिस मदत केंद्रावरील पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरू केले.   सर्व अपघातग्रस्तांना विसरवाडी, नवापूर, साक्री व नंदुरबार येथून  रुग्णवाहिका मागून त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी व परिचारिका वर्ग तसेच कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर रुग्णांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले. तसेच काही रुग्णांनी धुळे व सुरत येथे हलवण्यात आले.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एम काझी ,  विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील ,पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे व ५० पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी तळ ठोकून होते. यावेळी पोलीस दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात  आल्याचे पोलीस अधीक्षक पंडित यांनी दिली.
या अपघातामुळे पहाटे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी ती सुरळीत केली व बचाव कार्याला वेग दिला. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात किंग ट्रॅव्हल्स या बसचा चालक गणेश रघुनाथ बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम ट्रॅव्हल्स चे चालक वरदीचंद सोहनलाल मेघवाल त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व व पोलीस कर्मचारी करीत आहेत.
 

आठ तास मृतदेहांवर होता लटकून...
शेवटच्या जखमीला बाहेर काढण्यास दुपारचे १२ वाजले होते. याच जखमीच्या खाली दोन मृतदेह लटकलेले होते. ही बाब जखमीला कळू नये यासाठी बचाव पथकाने आवश्यक ती खबरदारी घेतली. ते पाहून किंवा ऐकुण त्याचा धसका त्याने घेऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अखेर त्याला बाहेर काढल्यावर दोन्ही मृतदेहही कटरने बसचा पत्रा कापून बाहेर काढले. या सर्व घडामोडी होत असतांना पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक तेथे थांबून होते. जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी घटनास्थळी देखील आरोग्य पथक तैणात करण्यात आले होते. 

Web Title: Add sugar while sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.