प्रेमीयुगुलाचा करुण अंत! संसार मोडून एकत्र आले, पण समाज विरोधाला कंटाळून जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:00 IST2025-10-07T13:00:28+5:302025-10-07T13:00:47+5:30
शेजाऱ्यांमध्ये प्रेम फुलले, संसार मोडून एकत्र राहिले; वर्षभरानंतर गावी परताच नातेवाईक, समाजाचा विरोध वाढल्याने प्रेमीयुगुलाचा टोकाचा निर्णय

प्रेमीयुगुलाचा करुण अंत! संसार मोडून एकत्र आले, पण समाज विरोधाला कंटाळून जीवन संपवले
हदगाव (नांदेड): 'प्यार किया तो डरना क्या' म्हणत संसार आणि मुलांना सोडून पळून गेलेल्या एका विवाहित प्रेमीयुगुलाचा प्रवास अत्यंत दु:खद पद्धतीने संपुष्टात आला. गावातील व नातेवाईकांचा विरोध तीव्र झाल्याने त्यांनी बामणीफाटा येथील शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या दोघांचाही ६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नेमके काय आहे प्रकरण?
हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रहिवासी असलेले गजानन केरबा गव्हाळे (वय ३५, व्यवसाय चालक) आणि उमा बालाजी कपाटे (वय २८) हे दोघेही विवाहित होते आणि त्यांना प्रत्येकी तीन अपत्ये होती. एकमेकांचे शेजारी असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मात्र, दोघांचेही संसार सुखाचे सुरू असतानाही त्यांनी समाजाला आणि कुटुंबाला झुगारून १९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलांना टाकून पलायन केले. जवळपास एक वर्षभर दोघेही एकत्र राहिले. परंतु, प्रेमाची नशा उतरल्यावर त्यांना कुटुंबाची आणि गावाची आठवण झाली. दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हे दोघेही गावी चिंचगव्हाण येथे परतले.
गावात तीव्र विरोध, टोकाचे पाऊल
गावी परत येताच त्यांना नातेवाईकांचा आणि समाजात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. विशेषतः, गजाननच्या पत्नीने त्यांना घरात घेण्यास स्पष्ट नकार दिला. समाजाच्या या विरोधामुळे आणि अवहेलना सहन न झाल्याने, दोघांनीही बाईकवरून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बामणीफाटा येथील एका पेट्रोल पंपावर बाईक सोडून जवळच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्याची माहिती गावातील काही तरुणांना मिळताच त्यांनी दोघांना तात्काळ हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दुसऱ्या दिवशी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आई-वडील आणि ६ अपत्यांना सोडून गेले!
या घटनेमुळे चिंचगव्हाण गावावर आणि दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, या दोघांनाही मिळून सहा अपत्ये आहेत. या आत्महत्येमुळे सहा निष्पाप मुलांचे छत्र हरवले आहे. रात्री उशिरा या दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या कृत्यामुळे मुलीकडील नातेवाईक इतके नाराज होते की, ते अंत्यविधीसाठीही आले नाहीत. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.