३९ वर्षांपासून प्रलंबित आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाच्या घळभरणी कामाचा प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:28 IST2025-05-09T12:27:18+5:302025-05-09T12:28:53+5:30
या प्रकल्पाचा गळभरणीचा प्रारंभ ३९ वर्षांनंतर भाजपा महायुती काळात होत आहे.

३९ वर्षांपासून प्रलंबित आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाच्या घळभरणी कामाचा प्रारंभ
मुखेड (जि.नांदेड) : गेल्या ३९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोणेगाव-रावणगाव येथील आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाचा अखेर पोलिस बंदोबस्तात घळभरणी कामाचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. आगामी काळात सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, आदींची विशेष उपस्थिती होती.
मुखेड तालुक्यातील गोणेगाव, रावणगाव येथील आंतरराज्यीय लेंडी प्रकल्प १९८६ साली माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी मंजूर केला होता. यात महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त खर्चातून कामाला सुरुवात झाली. हा प्रकल्प धरणग्रस्तांच्या मावेजाच्या मागणीवरून २०१२ पासून बंद होता. आता तब्बल ३९ वर्षांनंतर घळभरणीचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला हाेता. या प्रकल्पाचा गळभरणीचा प्रारंभ ३९ वर्षांनंतर भाजपा महायुती काळात होत आहे. सन २०१२ साली या भागातील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी ''आधी पुनर्वसन, मग धरण'' या धोरणातून तेरा वर्षे आंदोलन केले. या कालावधीत विविध प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. २७ हजार हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या लेंडी धरणाचा घळभरणी प्रारंभ होताना अतिशय आनंद होत आहे. या भागातील नागरिकांचे प्रश्न, लेंडी प्रकल्पाचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ते म्हणाले, तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, लेंडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही अपूर्ण मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, लेंडी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक तिडके, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, तहसीलदार राजेश जाधव, आदी उपस्थित होते.