मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:31 IST2025-05-02T16:30:18+5:302025-05-02T16:31:21+5:30
बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे.

मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले
राहेर (नांदेड) : घरात लगीनघाई, कुटुंबातला कनिष्ठ मुलगा लग्नाच्या बोहल्यावर चढणार, घरात कमालीचा उत्साह, लग्नाच्या पत्रिकांची छपाई, वधू-वरांची कपड्यांची खरेदी अन् लग्नाचे कार्यस्थळ निश्चित करत लग्नाची तयारी करणाऱ्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. नवरदेव संदीपचा बाप हृदयविकाराच्या धक्क्याने काळाने हिरावून नेला. बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे.
आरळी येथील सेवानिवृत्त वनमजुर मारोती सिद्राम इबत्तेवार (६२) हे मुलाच्या लग्नाची जय्यत तयारी करताना २५ एप्रिल रोजी रात्री इमारतीच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले, अन् शनिवार रोजी सकाळी सहादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाले. वृद्ध आईने आपला मुलगा मारोती गच्चीवरून खाली का येत नाही म्हणून त्याला उठवण्यासाठी गच्चीवर गेली. तो उठत नसल्याचे पाहून कांगावा केला अन् लगीनघाई असलेल्या या घरात दुःखाने संचार केला. सर्व कुटुंब शोकसागरात बुडाले.
मुलाचे लग्न पाहण्याचा योग नशिबी नव्हता
वडील मारोती यांनी आपल्या मुलाचे लग्न धूमधडाक्यात लावण्यासाठी १४ मे चा मुहूर्त काढून, लग्न मंडप, आचारी, वधू-वरांचे कपडे, पत्रिकांची छपाई करत मुलाचे दोनाचे चार हात करण्याचे स्वप्न पाहिले. गावातील नातेवाईक, मित्र परिवारांना लग्नासाठी आमंत्रित करू लागले; पण दैव जाणिले कुणी म्हटल्याप्रमाणे मुलाचे लग्न पाहण्याचाच योग त्यांच्या नशिबी नव्हता. मयत मारोती इबत्तेवार यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भाऊजयी, पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे.