'सर, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही झालो ऊसतोड मजूर'; विधानसभेत होणार का चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:21 IST2026-02-25T10:20:52+5:302026-02-25T10:21:56+5:30
मुखेड तालुक्यातील वास्तव: प्राथमिक शाळेची मान्यता मिळून एका शिक्षकाची नियुक्ती झाली. मात्र, तो केवळ तीन महिनेच राहिला.

'सर, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही झालो ऊसतोड मजूर'; विधानसभेत होणार का चर्चा?
नांदेड : राज्याने प्रगतीच्या वाटेवर मोठी झेप घेतली असली तरी ग्रामीण महाराष्ट्रातील मुले विकासापासून अद्याप कोसो दूर आहेत. मुखेड तालुक्यातील ७५० लोकवस्तीच्या रामदास तांड्यावर गेली ५४ वर्षे शिक्षणाची प्रतीक्षा कायम आहे.
प्राथमिक शाळेची मान्यता मिळून एका शिक्षकाची नियुक्ती झाली. मात्र, तो केवळ तीन महिनेच राहिला. सध्या ३० ते ३५ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे ही बालके कुटुंबाबरोबर ऊसतोडी करू लागली आहेत.
विधानसभेत उत्तर मिळाले... प्रश्न मात्र कायम राहिला
तांड्यावरील शाळेला शिक्षक मिळावा म्हणून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, काही उपयोग झाला नाही.
१८ मे २०१७ रोजी शिक्षणाधिकारी, नांदेड यांनी रामदास तांडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मान्यता दिली. त्यानंतर तेथे एका शिक्षकाची नेमणूक केली. मात्र, हा शिक्षक अवघे तीन महिने राहिला.
शिक्षक मिळेना... शिक्षणाशी संबंध तुटला
पावसाळ्यात या तांड्याचा नदी-नाल्यांमुळे बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. केवळ शिक्षक मिळत नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांची शाळा सुटली. शिक्षणाशी त्यांचा संबंध राहिलेला नाही.
ही बालके कुठेही काम करतात, तर काही बालके कुटुंबाबरोबर ऊसतोडीसाठी स्थलांतर झाल्याने तांड्याबाहेर गेली आहेत.