धक्कादायक! उसाच्या फडात कुजलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह
By प्रसाद आर्वीकर | Updated: September 22, 2023 12:18 IST2023-09-22T12:18:40+5:302023-09-22T12:18:55+5:30
तांदळी ते होनवडज या पाणंद रस्त्यावरील शेतात आढळला मृतदेह

धक्कादायक! उसाच्या फडात कुजलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह
शेखर पाटील
मुखेड : तालुक्यातील तांदळी येथील उसाच्या फडामध्ये एका शेतकऱ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
तांदळी येथील शेतकरी मधुकर दिगंबर वडजे (४०) हे १३ सप्टेंबरपासून गावातून निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाहीत. २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांदळी ते होनवडज या पाणंद रस्त्यावरील विठ्ठलराव जाधव यांच्या उसाच्या फडामध्ये एक मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटवली असतात तो मधुकर दिगंबर वडजे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
मधुकर वडजे यांच्यावर रानडुकरांनी हल्ला केला असावा, अशी चर्चा गावात होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तांदळी येथेच २१ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मधुकर वडजे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुठलीही नोंद घेतली नाही. मधुकर वडजे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.