धक्कादायक! पोलिसाच्या फोनवरून अटक आरोपीने केला फरार आरोपीस व्हिडीओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:27 IST2025-06-20T16:26:37+5:302025-06-20T16:27:18+5:30

आरोपीची व्हीआयपी बडदास्त ठेवणे भोवले, पोलिस अंमलदार निलंबित

Nanded: Arrested accused made a video call to absconding accused from police phone | धक्कादायक! पोलिसाच्या फोनवरून अटक आरोपीने केला फरार आरोपीस व्हिडीओ कॉल

धक्कादायक! पोलिसाच्या फोनवरून अटक आरोपीने केला फरार आरोपीस व्हिडीओ कॉल

नांदेड : गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीची व्हीआयपी बडदास्त ठेवणे पोलिस अंमलदारास चांगलेच महागात पडले आहे. अटक आरोपीस त्याच प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस चक्क व्हिडीओ कॉल करून बोलणे करून दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अंमलदार जतीन व्यंकटी सोनकांबळे यास निलंबित केले आहे. 

नांदेड ग्रामीण ठाण्यात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी हत्यार बाळगून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. पैकी, अटक असलेल्या एका आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली असून, त्यास वजिराबाद येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. १३ जूनला इतवारा ठाण्यात कार्यरत असलेले ठाणे अंमलदार जतीन व्यंकटी सोनकांबळे यांची नेमणूक सेंट्री म्हणून करण्यात आली होती. 

बंदोबस्तावर असताना आरोपीवर नजर ठेवण्याऐवजी पदाचा गैरवापर करून सोनकांबळे यांनी स्वत:च्या मोबाईलवर आरोपीने सांगितलेल्या व्यक्तीस व्हिडीओ कॉल करून दिला. विशेष म्हणजे सदर कॉल ज्याला केला तो व्यक्ती कुख्यात गुंड असून, या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जतीन सोनकांबळे याच्या निलंबनाचे आदेश मंजूर केले. या निर्णयामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आरोपींना व्हीआयपी सेवा
अटकेतील आरोपी व कारागृहातील वलंयांकीत कैद्यांची व्हीआयपी बडदास्त ठेवण्यात पोलिस दलातील काहीजण मदत करतात. बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड प्रकरणाने ही बाब नुकतीच पुन्हा एकदा अधोरेखीत झाली होती. ही बाब केवळ एका जिल्ह्यापूरती मर्यादीत नसुन प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी मदतीसाठी पुढे येते. ही मदत का केली जाते हे सर्वश्रुत आहे.

अधिकाऱ्यांनाही असावा कायद्याचा धाक
काही वर्षांपूर्वी खंडणीच्या माध्यमातून दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंडासाठी स्वतःला दबंग असल्याचे दाखवणारा एलसीबीतील पोलिस अधिकारीच वसुली करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली होती. त्याउपरही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आरोपीला पाठबळ देण्याचे प्रकार सुरुच असून त्यांचा शोध घेवून कायद्याचा धाक निर्माण करणे काळाची गरज आहे.

चौकशीनंतर पुढील कार्यवाही
लॉकअप ड्युटीवर असताना मोबाईलवर आरोपीस बोलणे करुन दिल्याची गंभीर बाब समोर आल्यावर ठाणे अंमलदार जतीन सोनकांबळे यास निलंबीत केले आहे. त्याची चौकशी सुरु असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक

Web Title: Nanded: Arrested accused made a video call to absconding accused from police phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.