तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:09 IST2025-09-25T18:07:40+5:302025-09-25T18:09:22+5:30
'९० दिवसांचे पीक, ६० दिवस पाऊस; सांगा साहेब, पीक कसे वाचणार?'; रुई येथील शेतकऱ्यांची मंत्र्यांसमोर व्यथा

तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'
हदगाव (नांदेड): सततच्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेला असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज रुई (ता. हदगाव) येथे राज्याचे जल व मृद संधारण मंत्री संजय राठोड यांच्या पाहणी दौऱ्यात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत तुटपुंजी असून, ती परत करण्याची वेळ आली आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
९० दिवसांचे पीक, त्यात ६० दिवस पाऊस
हदगाव तालुक्यातील रुई येथे कयादू नदीकाठी असलेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री राठोड यांनी भेट दिली. यावेळी भर पावसातही शेकडो शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते. "आम्ही पैसा टाकून बसलो आहोत, पण ९० दिवसांचे पीक आणि ६० दिवस पाऊस झाला, तर सांगा साहेब, पीक वाचणार तरी कसे?" असा प्रश्न शेतकऱ्यांनी मंत्र्यांना विचारला.
यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना थेट कर्जमाफीची मागणी केली. "यापूर्वी जाहीर केलेली मदत त्यावेळेसचे नुकसान पाहून होती, पण आता सप्टेंबर महिनाभर पाऊस झाल्याने थोडीफार आशा होती तीही मावळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांना आमच्या वेदना सांगा. आता नाही कर्ज माफ करणार तर कधी करणार?" असा सवाल कोहळीकर यांनी केला.
'जास्त नुकसान झालेल्यांना जास्त मदत'
शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी ऐकून मंत्री संजय राठोड यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे, त्यांना मदतही जास्त मिळालीच पाहिजे." शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीच्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, "तुमच्या भावना आणि मागण्या मी मुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार आहे. तुमच्या पिकाच्या नुकसानीचा लेखाजोखा मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल."
पत्रकारांनी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर मंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली असता, "मी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहे, तो विषय वेगळा आहे, त्यावर पुन्हा बोलू," असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. या पाहणी दौऱ्यात माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.