Lok Sabha Election 2019 : सांगलीच्या जागेसाठी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चर्चेतून निर्णय घ्यावा - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 19:11 IST2019-03-27T19:09:47+5:302019-03-27T19:11:55+5:30
स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यानी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करावी.

Lok Sabha Election 2019 : सांगलीच्या जागेसाठी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चर्चेतून निर्णय घ्यावा - अशोक चव्हाण
नांदेड : सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवावी या मागणीसाठी सांगली येथील २२ नगरसेवक आणि तीन जि. प. सदस्य बुधवारी नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीस आले होते. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना चर्चेचा सल्ला दिला.
महाआघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा अजूनही कायम आहे. सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी तेथील स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यानी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करावी. चर्चेतून मार्ग काढावा. यासंदर्भात मीही शेट्टी यांच्याशी चर्चा करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अंतर्गत वाद मिटवून जागा द्यावी - शेट्टी
महाआघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा अजूनही कायम आहे. सांगलीच्या जागेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसला अल्टीमेटम दिला आहे. आमचा फक्त सांगलीसाठी आग्रह नव्हता, तरीपण, विनाकारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा कुटुंबावर अन्याय केला जात असल्याबाबतचे चुकीचं वातावरण निर्माण केलं जातंय. आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या असा इशारा राजू शेट्टी यांनी काँग्रेसला दिला आहे. तसेच प्रतीक आणि विशाल पाटील यांनासुद्धा सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास आम्ही ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला. सांगलीत स्वाभिमानीकडे दोन ते तीन उमेदवार आहेत, योग्य वेळी उमेदवार जाहीर करू मात्र आघाडीकडून सांगली द्यायची असेल तर कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवून मगच आम्हाला द्या असं राजू शेट्टी यांनी सांगितले.