इतवारा भागातून दोन दुचाकी चोरीला
शहरातील इतवारा भागातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. जुना मोंढा येथील लक्ष्मी कापड दुकानासमोर मारोती नारायण कुंडलवार यांनी दुचाकी (क्र. एमएच २६ एबी ८५०९) उभी केली होती. त्यानंतर ते दुकानात कापड खरेदीसाठी गेले होते. त्याचवेळी चोरट्याने ३० हजार रुपयांची ही दुचाकी लंपास केली, तर फंक्शन हॉलच्या बाजूला पिरबाबू अब्दुल खादर यांची दुचाकी (क्र. एम.एच.२६ बीके ८३८६) लांबविण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चटणीचे पाणी तोंडावर फेकले
किनवट तालुक्यातील बोधडी येथे चटणीचे पाणी तोंडावर फेकल्यानंतर तिघांनी एका मिस्त्रीला जबर मारहाण केल्याची घटना २२ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. निखिल भगवान मुनेश्वर हे घरी असताना चंद्रमणी भगवान कदम, चंद्रकला कदम आणि यश कदम हे तिघे जण घरात आले. यावेळी त्यांनी मुनेश्वर यांच्या तोंडावर चटणीचे पाणी फेकले. त्यानंतर चाकूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
धर्माबाद तालुक्यातील पिंपळगाव येथे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑटो खरेदीसाठी पाच लाख रुपये आणि दोन तोळे सोने आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात ईरेश मारोती भोसकर, अनुसयाबाई भोसकर आणि रमेश भोसकर यांच्या विरोधात धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
शेतीच्या वादातून महिलेला मारहाण
कंधार तालुक्यातील कांजळा येथे शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना २४ मे रोजी घडली. लक्ष्मीबाई हिराबाई लोहकरे या शेतात असताना या ठिकाणी आनंदा हिरामण लोहकरे, सोन्याबाई आनंदा लोहकरे आणि सुभाष भागानगरे हे तिघे जण आले. यावेळी त्यांनी शेतीच्या कारणावरून वाद घालून लक्ष्मीबाई यांना मारहाण केली. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.