"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:57 IST2026-01-05T18:53:10+5:302026-01-05T18:57:48+5:30
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी मुंडे बहीण- भाऊ एकाच मंचावर उपस्थित होते.

"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!
लोहा (नांदेड): "देशात अनेक मोठे नेते झाले, पंतप्रधान झाले, पण वडिलांचे स्मारक उभारणारी मुलगी होण्याचे भाग्य मला लाभले, हेच माझे सर्वात मोठे यश आहे," अशा भावुक शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, याच सोहळ्यात त्यांनी परळी मतदारसंघाबाबत केलेल्या एका विधानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. "मी आता त्यांना (धनंजय मुंडे) परळी देऊन टाकली आहे, त्यांना तिथे प्रेम करू द्या," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
स्मारकाच्या अनावरणासाठी मुंडे बहीण-भाऊ एकत्र
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे रविवारी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि माजीमंत्री धनंजय मुंडे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "परळीवर जेवढं प्रेम आहे, तेवढंच माळाकोळीवर आहे. आता धनुभाऊंना परळीवर प्रेम करू द्या, मी त्यांना परळी देऊन टाकली आहे. माळाकोळी आमच्यावर परळीपेक्षा कणभर जास्तच प्रेम करेल."
विधानावरून चर्चांना उधाण
मंत्री पंकजा मुंडे यांच्या या विधानाचा अर्थ नेमका काय, यावर आता राजकीय विश्लेषकांमध्ये खल सुरू झाला आहे. महायुतीमध्ये परळीची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार की भाजप पंकजा मुंडेंना दुसऱ्या मतदारसंघातून संधी देणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे यांनीही यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत स्वतःला त्यांचा 'सावलीसारखा साथी' म्हटले.
यावेळी आमदार तुषार राठोड, माजी आमदार रोहिदास चव्हाण, शंकरराव धोंडगे, गोविंद अण्णा केंद्रे, माजी जि. प. सदस्य प्रणिता चिखलीकर, मुक्तेश्वर धोंडगे, पुरुषोत्तम धोंडगे, नगराध्यक्ष शरद पवार, सरपंच जनार्दन तिडके, शिवा संघटनेचे मनोहर धोंडे, पुतळा समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.