नांदेड: रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र पांढऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांसमोर अचानक अंधार पसरणे, काही क्षण काहीच न दिसणे आणि वाहनावरील नियंत्रण सुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात येणारे उच्च क्षमतेचे प्रोजेक्टर लाइट, एलईडी हेडलाइट व मॉडीफाइड हायबीम दिवे हे आता अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. रात्रीच्यावेळी झालेल्या अपघातातनांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत गत चार महिन्यांत अडीचशेवर जणांचे बळी गेले असून, सहाशेपेक्षा जास्त वाहनधारकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे विशेष.
वाहन उत्पादक कंपन्यांकडून १२ ते २४ व्होल्ट क्षमतेचे व मान्यताप्राप्त हेडलाइट बसविले जातात. मात्र, अनेक वाहनधारक नवीन वाहन खरेदी केल्यानंतर लगेचच कार डेकोरेटर किंवा इलेक्ट्रिशियनकडे जाऊन मूळ लाइट बदलून अधिक तीव्र उजेड देणारे प्रोजेक्टर लॅम्प बसवून घेत आहेत. विशेषतः पांढऱ्या रंगाचा लख्ख प्रकाश देणारे हे मॉडीफाइड लाइट समोरच्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर थेट परिणाम करतात. वाहतूक नियमांनुसार शहरांमध्ये, वर्दळीच्या भागात किंवा समोरून वाहन येत असताना, लो बीमचा वापर करणे अपेक्षित असते. तर, महामार्ग किंवा पूर्ण अंधार असलेल्या ठिकाणी मर्यादित वेळेसाठी हायबीमचा वापर करण्याची मुभा असते. मात्र, वास्तवात अनेक वाहनधारक सतत हायबीमवर वाहन चालवत असल्याचे दिसून येते. यामुळे समोरील वाहनधारकांच्या डोळ्यांवर ताण येऊन अपघातांची शक्यता वाढते.
काही सेकंदांचा अंधार ठरतो जीवघेणा
वाहने वेगात असताना, समोरून येणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे वाहनचालकांना काही सेकंदांसाठी ‘क्षणिक आंधळेपणा’ जाणवतो. या काळात समोरील रस्ता, वळण, खड्डे किंवा इतर वाहने स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी वाहनांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो. केवळ समोरून येणाऱ्या वाहनांचाच नव्हे, तर मागील बाजूने येणाऱ्या वाहनांच्या हेडलाइटचा परावर्तित प्रकाश साइड मिरर व सेंटर मिररमधून थेट डोळ्यांवर पडतो. त्यामुळे रात्री वाहन चालविणे ही अक्षरशः कसरत बनली आहे.
नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई
वाहनांवरील बेकायदेशीर प्रोजेक्टर लाइटमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने परिवहन विभाग, वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करावी. स्वतःचा रस्ता उजळताना दुसऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार निर्माण करू नका, असा संदेश देत सामाजिक स्तरावरही जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल.
-राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड.
Web Summary : Illegal high-beam lights are causing accidents in Nanded, Parbhani, and Hingoli. Over 250 deaths and 600 injuries occurred in four months. Authorities urge drivers to use low beams to prevent 'temporary blindness' and accidents. Action will be taken against violators.
Web Summary : नांदेड़, परभणी और हिंगोली में अवैध हाई बीम लाइटों से दुर्घटनाएँ हो रही हैं। चार महीनों में 250 से अधिक मौतें और 600 घायल हुए। अधिकारियों ने चालकों से 'अस्थायी अंधापन' और दुर्घटनाओं को रोकने के लिए लो बीम का उपयोग करने का आग्रह किया। उल्लंघनकर्ताओं के खिलाफ कार्रवाई की जाएगी।