माहूरात ३० लाखांत खवले मांजर विक्रीचा प्लान वनविभागाने उधळला, पाच तस्कर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:16 IST2025-08-20T19:16:08+5:302025-08-20T19:16:46+5:30
खवले मांजर वाचले, तस्कर गजाआड; माहूरात वनविभागाची मध्यरात्री कारवाई

माहूरात ३० लाखांत खवले मांजर विक्रीचा प्लान वनविभागाने उधळला, पाच तस्कर ताब्यात
- नितेश बनसोडे
माहूर (जि. नांदेड): तब्बल ३० लाखांत खवले मांजर विक्रीसाठी माहूर शहरात आलेल्या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने गुप्त कारवाईत ताब्यात घेतले. ही धडक कारवाई मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरा करण्यात आली. आरोपींकडून एक जिवंत खवले मांजर, एक कार व एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग (मुंबई) यांच्या गोपनीय माहितीनुसार नांदेड वनविभागाने सापळा रचला. उपवनसंरक्षक केशव वाभळे व किनवट सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव व प्रमोद राठोड यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला. नियोजित ठिकाणी कारमधून आरोपी खवले मांजर घेऊन आल्यानंतर पथकाने धाड टाकली आणि सर्वांना जेरबंद केले.
या प्रकरणी रुपेश मारोतराव चेनेकर (रा. वर्धा), बाळू पुंजाराम डोखळे, माधव पुंजाराम डोखळे, आनंद पांडुरंग भालेराव (रा. नांदेड) व जयदीप मारोती राठोड (रा. यवतमाळ) या पाच जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. खवले मांजर हे अधिनियमातील अनुसूची-१ मधील प्राणी असून त्याची तस्करी अथवा शिकार केल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. वनविभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करत आरोपींना तुरुंगात डांबले आहे.
या मोहिमेत वनपाल मनोहर कत्तुलवार, मीर साजिद अली, वनरक्षक निशांत दुर्गे, दीपक माने, ज्ञानेश्वर माळेकर, ओम वरकड, माधव डाके, गणेश काळे, अमोल गेडाम, बीजुसिंग गुसिंगे आदींचा मोलाचा सहभाग होता.
“वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बेकायदेशीर शिकार व व्यापार रोखण्यासाठी विभागाकडून कठोर कारवाई सुरूच राहील.”
- केशव वाभळे, उपवनसंरक्षक, नांदेड