नांदेड - कोविड संक्रमणाच्या काळात नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अनेक निर्णय घेतले. राज्य शासनाचा निधी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारणीसाठी मंजूर करून घेतला. त्यातील पुढील भाग म्हणून केंद्र सरकारच्या निधीतून जिल्ह्यासाठी आणखी एका ऑक्सिजन प्लँटची मंजुरी मिळाली आहे.
देशातील विविध शहरांमध्ये पी.एम.केअर फंडातून ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. हे ऑक्सिजन प्लँट उभारणीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेे देण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्री चव्हाण यांनी पाठपुरावा करून नांदेड जिल्ह्यासाठी आणखी एका ऑक्सिजन प्लँटची मंजुरी मिळवून घेतली आहे. हा ऑक्सिजन प्लँट येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यान्वित होणार आहे.
शहरामध्ये आणखी एका ऑक्सिजन प्लँट उभारल्यानंतर कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य शासनासोबतच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून त्यांनी या प्लँटची मंजुरी मिळविली आहे.