विद्यार्थी विकास संचालक पदावरून विद्यापीठात गोंधळ; वारंवार फेरबदलामुळे प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:28 IST2025-10-03T18:26:59+5:302025-10-03T18:28:40+5:30
विद्यार्थी विकास विभाग हा विद्यापीठातील सांस्कृतिक, कला आणि युवा उपक्रमांना चालना देणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो.

विद्यार्थी विकास संचालक पदावरून विद्यापीठात गोंधळ; वारंवार फेरबदलामुळे प्रश्नचिन्ह
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव काही दिवसांवर आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनात विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक पदाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र मागील काही दिवसांपासून या पदाच्या नियुक्तीवरून विद्यापीठ प्रशासनात गोंधळ आणि फेरबदल सुरूच आहेत.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ कॅम्पसमधील एका प्राध्यापकाला विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक पदाचा प्रभारी कार्यभार दिला होता. परंतु काहीच दिवसांत तो कार्यभार काढून दुसऱ्या प्राध्यापकाकडे सोपवण्यात आला. वारंवार होणाऱ्या या बदलांमुळे विद्यापीठाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विद्यार्थी विकास विभाग हा विद्यापीठातील सांस्कृतिक, कला आणि युवा उपक्रमांना चालना देणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. या विभागासाठी ९ जुलै २०२५ रोजी संचालक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत ६ प्राध्यापकांनी मुलाखती दिल्या. ११ जुलै २०२५ रोजी निवड समितीने देगलूर महाविद्यालयाचे डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांची निवड केली आणि त्यांना १५ दिवसांच्या आत रुजू होण्याचे आदेश दिले. तथापि, त्यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे ११ ऑगस्ट २०२५ रोजी माध्यमशास्त्र अभ्यास संकुलातील डॉ. सुहास पाठक यांना विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. पण दीड महिन्यानंतर ३० सप्टेंबर रोजी विद्यापीठाने अचानक त्यांचा कार्यभार संपुष्टात आणला आणि पुन्हा तीच जबाबदारी डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांच्याकडे सोपवली. या वारंवार फेरबदलामुळे विद्यापीठातील नियुक्ती प्रक्रियेवर संशय निर्माण झाला असून, आगामी युवक महोत्सवाच्या पूर्वतयारीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थी विकास विभागाच्या पूर्वी दिलेल्या प्रभारी संचालकाचा कार्यभार बदलण्यात आला असून, नव्याने दुसऱ्या प्राध्यापकाला प्रभारी संचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
- डॉ. डी.डी. पवार, प्रभारी कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड