तक्रारदाराकडे पैशाची मागणी; पोलिस अधीक्षकांनी दिले अंमलदाराच्या निलंबनाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:33 IST2025-11-24T13:29:06+5:302025-11-24T13:33:38+5:30
निलंबन कालावधीत पोलिस मुख्यालयाकडे सकाळ व संध्याकाळ असे दिवसातून दोनवेळा हजेरी लावणे बंधनकारक

तक्रारदाराकडे पैशाची मागणी; पोलिस अधीक्षकांनी दिले अंमलदाराच्या निलंबनाचे आदेश
अर्धापूर (जि. नांदेड) : पोलिस ठाण्यात तक्रारदार व्यक्तीकडून प्रकरण डिसमिस करतो म्हणत पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरून अर्धापूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अंमलदाराला निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तक्रारी अर्जानंतर ही कारवाई केली. कानबा दिगांबर जारंडे, असे पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
अर्धापूर पोलिस ठाण्यामध्ये अर्जदार विकास प्रल्हाद मामनगर हे २९ ऑक्टोबर रोजी घरगुती तक्रार अर्ज देऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर गेले. त्यानंतर पोलिस अंमलदार कानबा दिगांबर जारंडे यांनी अर्जावरील अर्जदाराच्या मोबाइलवर कॉलद्वारे संपर्क साधून अर्जदाराला पोलिस ठाण्याच्या गेटजवळ बोलावले. ‘मी तुझी केस आडे यांना सांगून डिसमिस करून घेतो. त्यासाठी माझ्या मोबाइलवर एक हजार रुपये पाठव’ असे सांगितले.
मुख्यालयात मारावी लागणार दोन वेळेस हजेरी...
कानबा जरांडे यांचे वर्तणूक, चारित्र्य संशयास्पद व कर्तव्यात गंभीर स्वरूपाचे बेजबाबदार, गैरशिस्त केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम २५ पोटकलम २ व महाराष्ट्र पोलिस (शिक्षा व अपील) नियम-१९५६ मधील नियम क्र. ३ (१-अ) (आय) (बी) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार अंमलदार जारंडे यांना निलंबित केले. तसेच कानबा जरांडे यांना निलंबन कालावधीत पोलिस मुख्यालयाकडे सकाळ व संध्याकाळ असे दिवसातून दोनवेळा हजेरी लावणे बंधनकारक असल्याचे निलंबन पत्रात नमूद करण्यात आले.