Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:16 IST2025-06-13T14:15:03+5:302025-06-13T14:16:40+5:30

एकुलत्या एक मुलाने घेतले टोकाचे पाऊल, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू; दुहेरी आघाताने हार्टअटॅक येऊन आई रुग्णालयात दाखल

A mountain of trauma hits a single family in 48 hours in Sawargaon of Nanded district: Father dies in shock after young man ends his life, mother suffers heart attack | Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक

Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक

- गोविंद कदम
लोहा:
तालुक्यातील सावरगाव  (न) येथे अवघ्या ४८ तासांत हसतं खेळतं कुटुंब संपल्याने अख्ख गाव सुन्न झाले आहे. एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराहून घरी येताच अवघ्या काही तासांत वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर दुःखाचा दुहेरी आघात झाल्याने आईला देखील हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राहुल बेद्रे (वय २७)आणि भीमराव बेद्रे (वय ६०) असे मृत बापलेकाचे नाव आहे. तर शोभाबाई बेद्रे यांच्यावर नांदेड येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सावरगाव येथील भीमराव बेद्रे यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी अपत्य होत. त्यांना ४ एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो घरची शेती कसण्यासोबत मोलमजुरी करून वडिलांना हातभार लावत होता. सोमवारी ९ जून रोजी त्याने दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजंदारीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर शेतात जाऊन येतो म्हणून तो गेला होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. गावकऱ्यांनी शोध घेतला असता शेतातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे समोर आले.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा धक्का
राहुलने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र एकुलत्या एक मुलाने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने वडील भीमराव बेद्रे यांना धक्का बसला. १० जुन रोजी मंगळवारी मुलाच्या अंत्यविधीनंतर घरी येताच भीमराव बेद्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, १२ जूनला पहाटे पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

आईवर एकाचवेळी दुहेरी आघात
दरम्यान, मुलापाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याच्या दुहेरी आघाताने शोभाबाई देखील खचून गेल्या. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने शोभाबाई पतीचं अंतिम दर्शनही घेऊ शकल्या नाहीत. गावकऱ्यांनीच काही नातेवाईकांच्या उपस्थितीत भीमराव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अवघ्या ४८ तासांत या दु:खद घटनाक्रमामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, "हसतं-खेळतं कुटुंब डोळ्यासमोर उध्वस्त झालं" अशा भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

Web Title: A mountain of trauma hits a single family in 48 hours in Sawargaon of Nanded district: Father dies in shock after young man ends his life, mother suffers heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.