वाकीच्या डोहात पुन्हा गेला एक जीव, २४ तासांनंतर मृतदेह गवसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:07 IST2023-11-22T14:07:09+5:302023-11-22T14:07:41+5:30
पाेहण्याचा माेह अंगलट : अकस्मात मृत्यूची नाेंद

वाकीच्या डोहात पुन्हा गेला एक जीव, २४ तासांनंतर मृतदेह गवसला
खापा (नागपूर) : नागपूर शहरातील तरुण मित्रांसाेबत वाकी (ता. सावनेर) येथे देवदर्शन व फिरायला आला. ताे लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात पाेहायला उतरला आणि खाेल पाण्यात गेल्याने बुडाला आणि बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी घडली असून, साेमवारी (दि. २०) त्याचा मृतदेह शाेधण्यात पाेलिसांना यश आले.
शाहीद अख्तर शकील अहमद अन्सारी (३२, रा. माेमीनपुरा, नागपूर) असे मृताचे नाव आहे. शाहीद अख्तर हा त्याच्या काही मित्रांसाेबत रविवारी दुपारी वाकी परिसरात फिरायला आला हाेता. सुरुवातीला त्यांनी ताजुद्दीन बाबांचे दर्शन घेतले आणि नंतर दर्ग्याच्या मागे असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात गेला. नदीच्या पात्रातील डाेहात पाणी बघून त्याला पाेहण्याचा माेह अनावर झाला.
ताे डाेहात बुडाल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून हितज्याेतीचे हितेश बन्साेड व पाेहणाऱ्या स्थानिक तरुणांच्या मदतीने शाहीद अख्तरचा डाेहात शाेध घेतला. पहिल्या दिवशी अंधारामुळे थांबविण्यात आलेले शाेध कार्य दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारी त्याचा मृतदेह शाेधून काढण्यात यश आले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटाेपल्यानंतर शाहीद अख्तरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास ठाणेदार मनाेज खडसे करीत आहेत.
डाेहात उतरण्याची हिंमत होईना
डाेहात पाेहत असताना ताे खाेल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. नागरिक गाेळा झाले, पण कुणीही पाण्यात उतरण्याची हिंमत केली नाही. पाेलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शाेधकार्य सुरू झाले. वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रातील डाेह अत्यंत धाेकादायक असल्याची माहिती स्थानिकांना असल्याने कुणीही कधीच डाेहात उतरण्याची हिंमत करीत नाही.