भावनेला किंमत नसल्याची खंत : यशोधरानगरात घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नासाठी प्रियकर आणि घरच्यांनी धीर धरण्याचा सल्ला दिला म्हणून संतप्त झालेल्या एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ११.३० ला ही घटना उघडकीस आली.
नीताली गंगाधर निखार असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती पाठराबे वाडीमध्ये राहत होती. वयाची नुकतीच १८ वर्षे पूर्ण केलेल्या नीतालीचे शिक्षण सुरू होते. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे ती शांतिनगरातील एका हँडलूममध्ये कामाला जात होती. तेथेच कामाला असलेल्या एका तरुणाशी तिचे सूत जुळले. या दोघांनी लग्नाचाही निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, मिताली शुक्रवारी दुपारी तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचली. तिने त्याच्यामागे लग्नासाठी हट्ट धरला. ‘सध्या दिवस बरे नाहीत, वातावरण चांगले झाल्यानंतर आपण लग्न करू,’ असे तिचा प्रियकर म्हणाला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही तिची समजूत काढली. मात्र तिचा हट्ट सुरूच होता. त्यामुळे मितालीच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तिच्या पालकांनीही तिला ‘नुकतीच १८ वर्षे पूर्ण झाली आहेत; त्यामुळे नंतर लग्न लावून देतो,’ असे सांगितले. कुणीच आपल्या शब्दाला किंमत देत नसल्याची भावना झाल्यामुळे मिताली अस्वस्थ झाली. आपल्या भावनांना किंमत नसल्याचा तिने गैरसमज करून घेतला. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तिने गळफास घेतला. तिची आई वनिता गंगाधर निखार यांनी यशोधरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक एम. डी. शेख यांनी घटनास्थळ गाठून नीतालीच्या घराची तपासणी केली. मृत्यूपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात घरच्यांची माफी मागून जगण्याची इच्छा नसल्याचे तिने म्हटले. आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये, असेही मितालीने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. तिच्या या आत्मघातकी पावलामुळे घरच्यांना, खास करून तिच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.
---