होय, हे सत्य आहे! फुलपाखरांच्या सौंदर्यात दडलेय विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:00 AM2020-08-03T07:00:00+5:302020-08-03T07:00:32+5:30

काही प्रजातीची फुलपाखरे ही विषारी असतात. ती कुणाला चावत नाही व त्यांच्यामुळे माणूसही दगावत नाही.

yes its true! Poison hidden in the beauty of butterflies! | होय, हे सत्य आहे! फुलपाखरांच्या सौंदर्यात दडलेय विष !

होय, हे सत्य आहे! फुलपाखरांच्या सौंदर्यात दडलेय विष !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निशांत वानखेडे
नागपूर : निसर्गाने मुक्तपणे रंगांची उधळण करून अप्रतिम सुंदरतेने सजविलेली फुलपाखरे विषारी असतात काय, असा प्रश्न विचारला तर लोक नक्कीच वेड्यात काढतील. कारण फुलपाखरे विषारी असतात, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण होय, हे सत्य आहे. काही प्रजातीची फुलपाखरे ही विषारी असतात. ती कुणाला चावत नाही व त्यांच्यामुळे माणूसही दगावत नाही. मात्र अशा फुलपाखरांना एखाद्या पक्ष्याने भक्ष्य बनविले तर त्याचा जीव गेलाच म्हणून समजा. पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी शरीरात असलेले हे विष फुलपाखरासाठी मात्र वरदानच ठरते.

निसर्ग व फुलपाखरू अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी त्यांच्या निरीक्षणातील आश्चर्यकारक नोंदीची माहिती दिली. फुलपाखरांच्या कुंचलपाद जातीतील ‘पट्टेरी रुईकर’ नावाचे फुलपाखरू विषारी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखावर वाघाच्या अंगावर असतात तसे पट्टे असतात. हे फुलपाखरू भारतात सर्वत्र आढळते. साधारण: मध्यम आकाराच्या फुलपाखरांच्या पिवळ्या पंखांवर काळे पट्टे असतात. अमेरिकेत आढळणाऱ्या ‘मोनार्च’ या फुलपाखराशी याचे बरेच साम्य आहे. नर व मादी दोन्ही फुलपाखराचे पंख सारखेच असतात.

ज्या वनस्पतीचे पान किंवा देठ तोडल्यास दुधासारखा पदार्थ स्रवतो, अशा वनस्पतीना आपण दुधी वनस्पती म्हणतो. ‘रुई’ ही त्यातीलच एक वनस्पती. ‘पट्टेरी रुईकर’ या फुलपाखरांच्या माद्या ‘रुई’च्या झुडुपावर अंडी घालतात. अंड्यामधून बाहेर येणारे सुरवंट हे काळ्या रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर पांढºया-पिवळ्या रेषा व ठिपके असतात. सुरवंटची वाढ झाल्यावर ते कोषात स्वत:ला गुंडाळून घेतात. हे सुरवंट रुईच्या झाडाची पाने खाऊनच उपजीविका करतात. त्यामुळे रुईतील विषारी द्रव्य सुरवंटाच्या व पर्यायाने फुलपाखराच्या शरीरात जमा होतात. म्हणजेच रुई या वनस्पतीमधील विषाचा अंश पक्ष्याच्या शरीरात जाणारच. जर का हे फुलपाखरू एका चिमणीने किंवा बुलबुल पक्ष्याने खाल्ले तर ते विष पक्ष्याला इजा होण्याइतपत पुरेसे आहे. म्हणून सहसा असे पक्षी या फुलपाखरापासून सावध असतात.

फुलपाखरे दिसायला सुंदर असतात एवढी जनमानसात त्यांची ओळख आहे. पण फुलपाखरांचे त्याही पलीकडे एक चमत्कारिक विश्व दडलेले आहे आणि त्यांचे विषारी असणे, हेही आश्चर्यच आहे. ते चावत नाहीत आणि त्यांना दातही नसतात. अनेक पक्षी फुलपाखरे आवडीने खातात. विशेषत: विणीच्या काळ्यात पिल्लाना भरविण्यासाठी पक्षी खास करून फुलपाखरांना भक्ष्य करतात कारण त्यातून अधिक ऊर्जा मिळते, असे मानले जाते. वेडा राघू, कोतवाल व इतर अनेक पक्षी फुलपाखरे आवडीने खातात. मात्र वनस्पतीतून शरीरात आलेले हे विष फुलपाखरांसाठी वरदान ठरते.
- यादव तरटे पाटील, सदस्स, राज्य वन्यजीव मंडळ

Web Title: yes its true! Poison hidden in the beauty of butterflies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.