यवतमाळ कारागृहात कैद्याचा मृत्यू

By Admin | Updated: May 16, 2014 00:07 IST2014-05-16T00:07:07+5:302014-05-16T00:07:07+5:30

बलात्काराच्या गुन्हय़ात न्यायाधीन बंदी असलेल्या एकाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

Yavatmal prison sentence death | यवतमाळ कारागृहात कैद्याचा मृत्यू

यवतमाळ कारागृहात कैद्याचा मृत्यू

यवतमाळ : बलात्काराच्या गुन्हय़ात न्यायाधीन बंदी असलेल्या एकाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास येथे घडली. सात महिन्यात यवतमाळ कारागृहातील तिसरा कैदी आजाराने मृत्यूमुखी पडला. त्यामुळे कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे.

गुलाब सुलाखे केवट (३0) रा. राजूर कॉलनी वणी असे मृत न्यायाधीन बंदीचे नाव आहे. त्याला बलात्काराच्या गुन्हय़ात वणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. त्यामुळे १६ ऑगस्ट २0१३ पासून तो यवतमाळ येथील कारागृहात न्यायाधीन बंदी होता.

गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गुलाबच्या छातीत अचानक वेदना व्हायला लागल्या. ही बाब त्याच्यासोबत कोठडीत असलेल्या अन्य कैद्यांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. कारागृह अधीक्षक कृष्णा भुसारी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारागृहाच्या डॉ.मस्के यांना पाचारण केले.

या वेळी डॉ.मस्के यांनी त्याची तपासणी केली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी तत्काळ गुलाबला येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले.

मात्र उपचाराला प्रतिसाद न देता तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाने वडगाव रोड पोलिसांना आणि उपविभागीय दंडाधिकार्‍यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेतली.

तसेच व्हीडीओ चित्रीकरणात गुलाबच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यापूर्वी सुनील हरिभाऊ सानप (४0) रा. टाकळी (धरण) या न्यायाधीन बंदीचा १६ एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यापूर्वी आसाराम आप्पा काळे (७३) रा. शहापूर जि. जालना याचा ९ नोव्हेंबर २0१३ रोजी कर्करोगाने मृत्यू झाला होता. सात महिन्यात तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याने कारागृह चांगलेच हादरले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal prison sentence death